येत्या महिन्याभरातच 2025 हे कॅलेंडर वर्ष संपणार आहे. शेअर बाजाराच्या दृष्टीने हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी लाभदायक ठरले. दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी नवीन उच्चांकी पातळी नोंदवली. समभागांची खुली विक्री करणाऱ्या प्राथमिक भांडवल बाजारातही नवीन विक्रमाची नोंद झाली. अनेक गुंतवणूकदारांनी हव्यासापोटी किंवा अतीलोभापोटी हात पोळून घेतले. त्या पार्श्वभूमीवर सेबीची भूमिका, प्राथमिक भांडवल बाजाराची दिशा व दशा स्पष्ट करणारा लेख.
भांडवली बाजाराचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक प्राथमिक भांडवल बाजार जेथे कंपनीच्या पहिल्या समभागांची खुली विक्री ज्याला आयपीओ म्हणतात त्याद्वारे केली जाते. दुसरा दुय्यम शेअर बाजार म्हणजे शेअर बाजार किंवा स्टॉक एक्सचेंजेस होय. या बाजारात आयपीओ केलेल्या समभागांची नोंदणी झाल्यानंतर खरेदी – विक्री केली जाते. सध्या शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी नवनवीन उच्चांकी नोंदवली असून वर्षभरात गुंतवणूकदारांना खूप चांगला लाभ किंवा नफा झालेला आहे. त्याचवेळी समभागांची खुली विक्री ( ज्याला इनिशियल पब्लिक ऑफरिंग – आयपीओ म्हणतात) केली जाणाऱ्या प्राथमिक भांडवल बाजारानेही या वर्षात उत्साहवर्धक कामगिरी केली आहे. गेली काही वर्षे प्रतिकूल अवस्थेतून जाणारा प्राथमिक भांडवल बाजार 2025 मध्ये नवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. इक्विरस कॅपिटल या बँकिंग व आर्थिक सेवा कंपनीने या बाजाराचा नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार 2020 ते 2025 या पाच वर्षांमध्ये प्राथमिक भांडवल बाजारामध्ये एकूण 336 कंपन्यांनी त्यांच्या समभागांची पहिल्यांदा खुली विक्री केली. या विक्रीद्वारे सर्व कंपन्यांनी मिळून एकूण 5.39 लाख कोटी रुपये भांडवलाची उभारणी केली. या तुलनेत 2000 ते 2020 या गेल्या वीस वर्षांमध्ये 658 कंपन्यांनी एकूण 4.55 लाख कोटी रुपये भांडवलाची खुली समभाग विक्री केली होती. त्याचप्रमाणे वीस वर्षातील एका खुल्या समभाग विक्रीचे सरासरी आकारमान 692 कोटी रुपये होते तर गेल्या पाच वर्षात त्यात दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली असून प्रत्येक विक्रीचा सरासरी आकार 1605 कोटी रुपये इतका होता. यामध्ये प्रवर्तकांनी त्यांच्याकडे असलेल्या समभागांची खुली विक्री करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होते. त्याचप्रमाणे अनेक खाजगी इक्विटी फंडांनी या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. अशा अनेक फंडांना या खुल्या विक्रीमुळे उत्तम परतावा घेऊन बाहेर पडणे शक्य झाले आहे. या प्रतिसादामुळे पुढील वर्षी म्हणजे 2026 मध्ये किमान दोन लाख कोटी रुपयांचे भाग भांडवल उभारले जाईल अशी शक्यता व्यक्त केली आहे. एका बाजूला प्राथमिक भांडवली बाजाराची दिशा अत्यंत जोरदार स्पष्ट झालेली आहे. यामुळे शेअर बाजाराला पुढील वर्षात आणखी चालना मिळण्याची मोठी संधी आहे. परंतु या वर्षात गुंतवणूकदारांची जी प्राथमिक भांडवली बाजाराकडे पाहण्याची वृत्ती निर्माण झालेली आहे त्याबाबत स्पष्टपणे लिहिणे आवश्यक आहे. प्राथमिक भांडवल बाजारात येणारा प्रत्येक पब्लिक इशू हा चांगल्या दर्जाचा खऱ्या अर्थाने गुंतवणूक करणारा करण्याच्या लायकीचा आहे किंवा कसे हे पाहण्याची जबाबदारी प्रत्येक गुंतवणूकदाराची आहे. भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या दि सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी यांनी प्रत्येक कंपनीच्या प्रस्तावाचा तपशीलवार विचार करून त्याचा तौलनिक अभ्यास करून त्यांना बाजारात उतरून मुक्त किंमतीला समभाग विकण्याची परवानगी दिलेली आहे. प्रत्येक कंपनी त्यांच्या समभागाची खुली विक्री करत असताना मोठ्या प्रमाणावर जाहिराती करते, अप्रत्यक्षरीत्या वृत्तपत्रांच्या किंवा अन्य प्रसार माध्यमांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना भुलवण्याचे काम जाहिराती करतात. प्रत्येक कंपनी अर्जासोबत एक प्रॉस्पेक्टस म्हणजे माहितीपत्रक प्रसिद्ध करत असते. त्यामध्ये कंपनीचे प्रवर्तक, त्यांचा व्यवसाय, शिक्षण याचबरोबर संपूर्ण प्रकल्पाची तांत्रिक व आर्थिक माहिती प्रसिद्ध करत असते. एवढेच नाही तर प्रत्येक कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यामध्ये कोणती जोखीम आहे याचाही तपशीलवार उल्लेख केलेला असतो. तसेच कंपनी विरुद्ध असणारे न्यायालयातील दावे, कर्मचाऱ्यांचे दावे ही सर्व माहिती त्यात दिलेली असते. सेबीच्या नियमानुसार प्रत्येक कंपनी त्यांच्या एकूण कारभाराची जास्तीत जास्त माहिती यामध्ये प्रसिद्ध करते. परंतु अनेक वेळा असे आढळून आलेले आहे की त्या माहितीच्या पलीकडे खूप काही गोष्टी कंपनीच्या बाबतीत प्रत्यक्षात घडत असतात व त्याचा कोठेही माहितीपत्रकात उल्लेख नसतो. अनेक प्रकरणांमध्ये कंपनीच्या प्रवर्तकांनी अगदी नाममात्र किमतीला त्यांचे समभाग घेतलेले आहेत.त्याच्या कित्येक पटीने बाजारात विक्री केली जाते.कंपनी त्याचे समर्थन करत असले तरी अशा कंपन्यांचा आर्थिक अभ्यास केला तर यामध्ये प्रवर्तक किंवा अन्य गुंतवणूकदार प्रचंड नफा कमवतात हे लक्षात आले तर अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे हे टाळलेच पाहिजे.प्रत्येक कंपनीची आर्थिक लायकी ठरवण्याचे अनेक उपाय गुंतवणूकदारांच्या हातात असतात त्याचा त्यांनी वापर केलाच पाहिजे.
गेल्या दहा महिन्यांमध्ये ज्या कंपन्यांनी भरमसाठ, अव्वाच्या सव्वा किंमतीला त्यांच्या समभागांची विक्री केली त्या किंमतीपेक्षा कमी भाव बाजारातील नोंदणीच्या वेळी किंवा त्यानंतरच्या व्यवहारांमध्ये घसरल्याचे आढळले आहे. एकंदरीत हजारो गुंतवणूकदारांना या वर्षात पब्लिक इशूच्या मध्ये गुंतवणूक करण्यात मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. यासाठी भांडवली बाजाराचे नियमक असलेल्या सेबीला अजिबात दोष देता येणार नाही. प्रत्येक गुंतवणूकदाराने भांडवली बाजारात गुंतवणूक करताना योग्य ती खबरदारी घेणे व जोखीम लक्षात घेऊन गुंतवणूक करणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात पैशाची हाव सुटल्याप्रमाणे छोटा मोठा गुंतवणूकदार वर्ग खुल्या विक्रीमध्ये गुंतवणूक करून नोंदणीच्या वेळी भाव दुप्पट तिप्पट होतील असे गृहीत धरून गुंतवणूक करतो हे चुकीचे आहे.अनेक कंपन्यांची लायकी किंवा आर्थिक क्षमता नसतानाही त्यांच्या समभागांची विक्री कित्येक पटीने जास्त किमतीने केली जाते. यामध्ये गुंतवणूकदारांनीच योग्य ती खबरदारी आणि जोखीम घेऊन गुंतवणूक करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात सामाजिक माध्यमे किंवा वृत्तपत्रांच्या जाहिरातींच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक होते असे लक्षात आले आहे. मात्र सेबीने या सर्व प्रकरणांमध्ये योग्य ती काळजी आणखी घेण्याची गरज आहे. प्रत्येक कंपनीने जास्तीत जास्त पारदर्शकपणे सर्व प्रकारचे आर्थिक व अन्य माहिती प्रसिद्ध करणे हे क्रमप्राप्त आहे. परंतु काही पब्लिक इशूमध्ये कंपन्या जी माहिती प्रसिद्ध करतात त्यापेक्षा त्यांनी जास्त दडवलेले असते असे अनेक वेळा लक्षात आलेले आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदाराच्या लक्षात अनेक वेळा या गोष्टी येत नाहीत व संबंधित कंपनीच्या समभागांची नोंदणी बाजारात झाल्यानंतर त्यांना फटका बसतो. त्यामुळे सेबी ने कोणत्याही कंपनीच्या किंमत पट्ट्यावर नियंत्रण ठेवण्याची अजिबात गरज नाही. जसे शेअर बाजारामध्ये गुंतवणूकदारांनी कोणत्या किमतीला शेअर घ्यावा किंवा कधी विक्री करावी याची जोखीम त्यानेच बाळगणे आवश्यक असते. यात त्याचा तोटा झाला तर सेबीला जसे जबाबदार धरता येणार नाही तसे प्राथमिक भांडवल बाजारामध्ये येणाऱ्या प्रत्येक आयपीओ च्या मागे धावण्याची गरज नाही हे जोपर्यंत सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत सेबीला दोष देता येणार नाही.त्यामुळे त्यांच्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी ‘सेबी’वर ढकलता येणार नाही. त्यामुळेच प्राथमिक भांडवल बाजाराची वाटचाल योग्य दिशेने सुरू असताना गुंतवणूकदारांच्या लोभापोटी, हावरटपणापोटी या बाजाराची “दशा” झालेली आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे. त्यासाठी सेबीला जबाबदार धरता येणार नाही. त्यांनी यात लक्ष घालून किमतीवर नियंत्रण ठेवावे असे म्हणणेही योग्य व वावगे ठरणार नाही. प्रत्येक गुंतवणूकदाराने स्वतःचा योग्य अभ्यास करूनच गुंतवणुकीची जोखीम पत्करावी हे त्यांच्याच हिताचे आहे. असे झाले तरच त्यांची “दशा” होणार नाही हे निश्चित.
(प्रा. नंदकुमार काकिर्डे)*

