मुंबई/मुंबई महापालिका निवडणुकी आधीच प्रारूप मतदार यादीतील मोठे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईतील मतदार यादीत तब्बल ११ लाखांहून अधिक दुबार नावे आढळली आहेत. यामध्ये एका व्यक्तीचे नाव तर १०३ वेळा विविध ठिकाणी नोंदवले गेले असल्याची माहिती उघड झाली आहे.
एकत्रित तपासणीत ४.३३ लाखांहून अधिक दुबार जोड्या स्पष्टपणे ओळखल्या गेले असून, यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने मतदार यादी शुद्धीकरणासाठी २३नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान विशेष मोहिम जाहीर केली आहे. प्रत्येक विभाग कार्यालयात हेल्प-डेस्क सुरू करण्यात आले असून नागरिकांना आधार किंवा अन्य ओळखपत्रासह नाव तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने मुंबईतील २२७ प्रभागांच्या रचनेला मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर प्रभाग आरक्षणाची यादीही जाहीर करून निवडणूक प्रक्रियेला गती मिळाली आहे. प्रभाग रचना आणि मतदार यादी शुद्धीकरण पूर्ण झाल्यानंतरच बीएमसी निवडणुकीची अंतिम तारीख जाहीर होणार आहे. दुसरीकडे, राजकीय पक्षांमध्ये हालचालींना जोर आला आहे. शिवसेना (दोन्ही गट), भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे वेगवेगळे गट आणि मनसे यांनी उमेदवार निवड, प्रभागनिहाय रणनीती आणि गठबंधनाच्या शक्यतांवर तयारी सुरू केली आहे. मुंबईतील सर्वात संपन्न आणि प्रतिष्ठेच्या महापालिकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व पक्षांकडून व्यापक नियोजन सुरू असून, मतदार यादीतील गोंधळाच्या मुद्द्यावरून आगामी काळात राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

