..
पाटणा/ बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या आरजेडीला मोठा धक्का बसला आहे. अशातच आता लालूंच्या कुटुंबातील कलह समोर आला आहे. लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी राजकारण सोडण्याचा आणि कुटुंबापासूनही दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. रोहिणी यांनी थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. त्यानंतर आता रोहिणी यांनी भाऊ तेजस्वी यादव यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. तू आमच्याबद्दल काही बोललीस तर तुला चपलेने मारू असा इशारा मला देण्यात आल्याचे रोहिणीने म्हटले आहे.
आज दुपारी सोशल मीडियाद्वारे राजकारण सोडण्याची घोषणा केल्यानंतर सायंकाळी रोहिणी या दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्या. यावेळी पत्रकारांसोबत बोलताना रोहिणी यांनी, ‘माझे कोणतेही कुटुंब नाही. आता संजय, रमीज आणि तेजस्वी यादव यांना जा आणि विचारा. या लोकांनी मला घराबाहेर काढले. त्यांना पराभवाची जबाबदारी घ्यायची नाहीये. जो चाणक्य होईल त्याला प्रश्न विचारला जाईल. पक्षाची ही अवस्था का झाली असा प्रश्न कार्यकर्ते चाणक्य यांना प्रश्न विचारत आहेत. तुम्ही संजय, रमीज आणि तेजस्वी यादव यांचा उल्लेख केला तर तुम्हाला घराबाहेर काढले जाईल. तुमची बदनामी केली जाईल. तुम्हाला शिवीगाळ केली जाईल आणि चप्पलांनी मारहाण केली जाईल.’ असा गंभीर आरोप केला आहे त्यामुळे या पराभवाचा लालूच्या कुटुंबावर सुधा परिणाम झाल्याचे दिसत आहे.

