वयोमर्यादा ओलांडलेल्याचेही पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण होणार
मुंबई/. पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी सरकारने गुडन्यूज दिली आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार असून त्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. आता, या भरतीमध्ये सन २०२२ पासून २०२५ पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक वेळची संधी देण्यात येत आहे, विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे आणि भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय १० सप्टेंबर २०२५रोजी गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे. त्यामुळे, भरतीची तयारी करणाऱ्या आणि वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या उमेदवारांना ही नामी संधी आहे.
राज्याच्या पोलीस दलात सन २०२४ दरम्यान रिक्त असलेली आणि २०२५ मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन १५हजार पदांची पोलीस भरती करण्यात येत आहे. पाच प्रकारच्या पदांसाठी ही भरती होणार असून त्याची जाहिरात प्रकाशित झाली आहे. या पोलिस भरती प्रक्रियेकरीता ज्यांची वयोमर्यादा संपली होती अशा सन २०२२ ते २०२५ पर्यंतच्या सर्व उमेदवारांना फॉर्म भरुन भरतीसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. या सुवर्णसंधीचा सर्वच उमेदवारांना लाभ घेता येईल. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून याबाबतचे शुद्धिपत्रक काढण्यात आले.त्यामुळे, वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना ही चागंली संधी आहे. दरम्यान, गेल्या 2-3 वर्षांपासून पोलीस भरती रखडली होती. त्यामुळे, विद्यार्थ्यांसह विविध संघटनांकडून भरतीची मागणी केली जात होती. अखेर, भरती प्रक्रिया सुरू झाली असून वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही शासनाने संधी देऊ केलीराज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1 जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत रिक्त झालेली आणि 1 जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत रिक्त होणारी एकूण १५६३१ पदे भरतीसाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक नुसार सन २०२२ व सन २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे. मात्र, शासनाच्या नव्या शुद्धपत्रकानुसार, सन २०२२, २०२३, २०२४ व २०२५ मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे.”, असे आदेशच शासनाने दिले आहेत. त्यामुळे, २०२२ ते २०२५ या ४ वर्षांच्या कालावधीतील वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे.
