मुंबई : माय महानगरचे प्रतिनिधी स्वप्निल जाधव यांना हात काढून हातात देईन, अशी धमकी देणारे वांद्रे पूर्वचे काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांच्या गुंडगिरीचा मुंबई मराठी पत्रकार संघाने तीव्र शब्दात निषेध केला आहे.
भाजपचे खा. बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी महिला कुस्तीपटूंकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे आणि इतर सोमवारी मंत्रालयानजीक राष्ट्रपित महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जमले होते. त्यावेळी स्वप्निल जाधव हे आ. प्रणिती शिंदे यांची बाईट घेत होते. त्या बाईटचे थेट प्रक्षेपण सुरू होते, त्यावेळी सिद्दीकी तेथे आले व प्रणिती शिंदेंना बोलवू लागले. या पार्श्वभूमीवर जाधव यांनी त्यांना हात लावून बाजूला होण्याची विनंती केली. प्रणिती शिंदे यांचा बाईट घेऊन झाल्यावर संतापलेले सिद्धीकी जाधव यांना म्हणाले, तू मला ओळखतोस ना, पुन्हा असे केले तर हात काढून हातात देईन.
आ. झिशान सिद्दीकी यांची ही भाषा धक्कादायक, संतापजनक आणि निषेधार्ह आहे. त्यांच्याविरोधात पोलिसांनी त्वरित गुन्हा नोंदवावा. तसेच काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघाने एका पत्रकाद्वारे केली आहे.
नरेंद्र वि. वाबळे
अध्यक्ष
संदीप चव्हाण
कार्यवाह
मुंबई मराठी पत्रकार संघ
