मुंबई – पुरुषांच्या बरोबरीने महिलाही आता नोकरी, उद्योगात अग्रेसर आहेत. मुंबईत नोकरीची संधी मिळालेल्या अनेक महिला राज्याच्या विविध भागातून मुंबईत येत असतात. प्रवासाचा वेळ आणि त्रास वाचावा यासाठी नोकरीच्या ठिकाणी जवळपास वसतिगृहाची सोय असावी, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. त्याची दखल घेऊन पालिका प्रशासनाने मुंबईत सात ठिकाणी महिलांसाठी वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईच्या शहर आणि उपनगरात महापालिकेचे सात प्रशासकीय विभाग आहेत. त्या सात विभागांत प्रत्येकी एक वसतिगृह उभारण्याचा पालिकेचा संकल्प आहे. नोकरदार महिलांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी वसतिगृह असावे, त्यामुळे त्यांचा प्रवासाचा वेळ वाचेल, हा त्यामागे उद्देश असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
पालिकेच्या भूखंडावर पुनर्विकास केल्या जाणाड्या मंडईंमध्ये महिला विक्रेत्यांना व्यवसायासाठी तात्पुरत्या स्वरूपात जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णयही पालिका प्रसासनाने घेतला होता. तसेच नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्याचाही निर्णय घेतला होता. त्या अनुशंगाने पालिकेने सुधारित विकास आराखड्यात विविध आरक्षणे प्रस्तावित केली आहेत. प्रत्येक प्रशासकीय विभागात एक हजार चौरस मीटर जागा नोकरदार महिलांच्या वसतिगृहासाठी आरक्षित ठेवण्यात आली असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. यंदा पालिकेने महिलांच्या वसतिगृहासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे
