मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खळबळजनक व्हिडीओ दाखवत शिवाजी पार्क येथील सभेत गौप्यस्फोट केला. मुंबईतील माहिमच्या समुद्रात अनधिकृत दर्गाचे बांधकाम सुरू असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. हे अनधिकृत बांधकाम एका महिन्यात न पाडल्यास त्याच्या बाजूला गणपती मंदिर उभे करू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
एकदा माहीम समुद्रात लोकांची गर्दी दिसली. त्यावेळी समुद्रात कसली गर्दी आहे, अशी विचारणा एकाला केली. त्यानंतर त्याने ड्रोन फूटेज पाठवले. त्यात हे बांधकाम सुरू असल्याचे उघड झाले. हे बांधकाम माहीमच्या मकदूम बाबाच्या दर्ग्यापासूनच्या किनाऱ्यापासून जवळ आहे. त्या ठिकाणी पोलीस स्टेशनदेखील जवळ असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे यांचा राज्य सरकारला इशारा
माहिमच्या समुद्रामध्ये दर्गा तयार करण्यात आला आहे. दोन वर्षात हा दर्गा उभारण्यात आला आहे. येत्या महिन्याभरात जर कारवाई झाली नाही, माहिमच्या समुद्रातील दर्गा तोडला नाही तर त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं करणार असं राज ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिसां, पालिका आयुक्त यांनी दाखल घ्यावी असे आवांहन केले . राज्यकर्ते, प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्यास काय होऊ शकते, हे लक्षात घ्या असे आवाहन राज यांनी उपस्थितांना केले.
भोंग्याच्या मुद्यावरून पुन्हा मनसे आक्रमक
मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांच्या मुद्यावरून पु्न्हा एकदा आक्रमक पवित्रा घेण्याचे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. मागील मविआ सरकारने भोंग्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या 17 हजार मनसैनिकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घेण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मशिदीवरील भोंगे काढावेत. एक तर तुम्ही करा किंवा आमच्याकडे दुर्लक्ष करा, आम्ही ते काढतो असेही राज ठाकरे यांनी म्हटले.
