पुणे – राजकारण म्हणजे निवडणूक लढवणे इतकेच नाही तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपला राजकारणाशी संबंध येतो त्यामुळे सध्या राजकारणात जे काही सुरु आहे ते वाईट असले तरी राजकारणात यायला हवे असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात एका व्याख्यानमालेत बोलताना सांगितले
ते म्हणाले, या आधीच्या पुण्यात आणि त्यानंतरच्या पुण्यात अनेक बदल झाले आहे. त्यावेळी नदी पलीकडचं पुणं आणि नदी अलीकडचं पुणं असे पुण्याचे केवळ दोन भाग होते. मात्र आता पुणं वाढत आहे. अनेक गाव पुण्यात समाविष्ठ झाले आहेत. त्यामुळे पुण्याचं रुपडं पालटलं. आता पुणं हिंजवडी, महाळुंगेपासून मगरपट्टापर्यंत पुणं पसरलं आहे. त्यामुळे मी मागील अनेक भाषणांमध्ये सांगत असतो कि मुंबई बरबाद व्हायला काही काळ गेला, पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, असं ते म्हणाले.
आजपर्यंत अनेकदा मोठ्या ठिकाणी भाषणं केली. सभा घेतल्या मात्र व्याख्यानमालेत आणि भाषणात फरक काय असतो ते सांगतो. व्याख्यानात जरा शांत भाषेत बोलावं लागतं तर भाषणात टीका करावी लागते. आज व्याख्यान करणार आहे. त्यामुळे व्याख्यानात जसं बोललं जातं त्याप्रमाणे मी बोलणार आहे, असं ते म्हणाले.
गुजरात आणि बिहारचे लोक महाराष्ट्राबाहेर गेले तर मुंबईत काहीच उरणार नाही, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते. मात्र त्याच राज्यातील लोकांना कामधंद्यासाठी महाराष्ट्रात यावं लागतं. त्यांना महाराष्ट्रानं मोठं केलं आहे, असंही म्हणत त्यांनी राज्यपालांना प्रत्युत्तर दिलं आहे. अमिताभ बच्चन जर त्यांच्या शहरातून मुंबईत आले नसते तर आज आपल्याला ते माहित नसते त्यांनादेखील महाराष्ट्रानं ओळख दिली आहे, असंही ते म्हणाले.
सध्याचं राजकारण बदलत आहे. विधानसभेतील कोणतेही भाषणं ऐकायची इच्छा होत नाही. यामुळे मुळ प्रश्न मागे पडतात आणि एकमेकांवर टीका केली जाते. आपल्यातील अनेकांनी मुळे प्रश्न विचारायचा हवेत. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं तरुणांनी राजकारणात सहभागी व्हावं. त्यांच्यामुळे महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असंही ते म्हणाले. अशा बदलत्या राजकारणामुळे तरुणाई दुरावली आहे त्यामुळे ही पीढी परदेशात जात आहे. अनेक परदेशी कंपन्यांनी भारताला डंम्पिंग ग्राउंड बनवलं आहे, असंही ते म्हणाले.
