जिहादी प्रवृत्तीविरोधात एकवटण्याचा आमदार जगताप व पडळकरांचा इशारा
कुपवाडमधील मोहन आणि मनीषा केसरेकर या दाम्पत्याच्या फरीद शेख याने केलेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ सांगलीत सकल हिंदू समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळून भव्य मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू झालेल्या या मोर्चाचे रूपांतर शहर पोलीस ठाण्यासमोर सभेत झाले.
“देश संविधानाने चालतोय, त्यामुळे हिंदू समाजाचा अंत पाहू नका; अन्यथा देशात आणि राज्यात राहू देणार नाही,” असा खरमरीत इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला. तसेच केसरेकर यांच्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन करत, त्यांना शासकीय नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी भावनिक होत, “केसरेकर दाम्पत्याने भगव्यासाठी बलिदान दिले आहे. जिहादी वृत्तीच्या हल्ल्यांविरुद्ध हिंदूंनी जात-पात विसरून एकत्र यावे,” असे सांगत मुलांचे पालकत्व राज्य सरकारने स्वीकारावे, अशी मागणी केली. तर आमदार महेश लांडगे यांनी जिहादी प्रवृत्तीच्या व्यापाऱ्यांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. भाजप नेते पृथ्वीराज पवार यांनी आरोपीला भरचौकात फाशी देण्याची मागणी केली.या मोर्चात बेळगावच्या हेब्बाळ गावातील नागरिकही सहभागी झाले होते. खानापूरचे आमदार विठ्ठल सोमण्णा हलगेकर यांच्या पाठपुराव्यामुळे कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून केसरेकर कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे.
