मुंबई:
दक्षिण मुंबईतील परेल (लक्ष्मी कॉटेज) परिसरात बुधवारी रात्री दोन गटांत झालेल्या किरकोळ वादानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घोषणाबाजी आणि शाब्दिक चकमकीनंतर दोन्ही बाजूंकडून धक्काबुक्की व किरकोळ दगडफेक झाली. मात्र, मुंबई पोलिसांनी प्रसंगावधान राखून तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली.
मिळालेल्या माहितीनुसार, ईदनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान गाड्यांच्या आवाजावरून आणि घोषणाबाजीवरून हा वाद पेटला. घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस ठाण्याचे पथक आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत गर्दी पांगवली आणि परिसराला वेढा घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली.
या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी रेहान मसूद सय्यद (१९), आदिल खान (१९) आणि मिराज फिरोज रईस (१८) यांच्यासह इतर संशयितांवर कारवाई केली आहे.
सध्या परेल आणि लालबाग परिसरात शांतता असून सुरक्षेचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे सह पोलीस आयुक्त डॉ. मनोज शर्मा यांनी नागरिकांना सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर किंवा आक्षेपार्ह व्हिडिओंवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
