मुंबईतील माझगाव परिसरात ‘माझगावचा मोरया’ गणपती मंडळाच्या आगमन मिरवणुकीवर एका इमारतीतून अंडी फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे गणेशभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी अवघ्या ३६ तासांत आरोपी दानिश शेर खान (२२) याला अटक केली आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने पाच पथके तैनात केली होती. तांत्रिक तपास आणि पुराव्यांच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला गजाआड करण्यात आले. पोलिसांनी परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणली असली, तरी या घटनेवरून राजकीय वातावरण तापू लागले आहे.
हा संपूर्ण प्रकार घडलेला माझगाव परिसर शिवसेना (ठाकरे गट) आमदार मनोज जामसुतकर यांच्या विधानसभा क्षेत्रात येतो, तर अरविंद सावंत हे या भागाचे खासदार आहेत. इतकी गंभीर घटना घडूनही आमदार मनोज जामसुतकर आणि खासदार अरविंद सावंत यांनी अद्याप जाहीरपणे या घटनेचा निषेध नोंदवलेला नाही.
गणेशोत्सवासारख्या संवेदनशील आणि धार्मिक उत्सवात घडलेल्या या प्रकारावर ठाकरे गटाचे हे लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प का बसले आहेत? असा थेट सवाल आता स्थानिक नागरिक आणि गणेशभक्तांकडून उपस्थित केला जात आहे.
