प्रजा फाउंडेशनचे आमदारांचे रिपोर्ट कार्ड वादाच्या भोवऱ्यात; एकच पक्षाचे आमदारांनाच अव्वल स्थान दिल्याने एकतर्फी मूल्यांकनाचा आरोप ?
मुंबई: प्रजा फाउंडेशनने वर्ष २०२६ साठी मुंबईतील आमदारांचे बहुप्रतिक्षित ‘रिपोर्ट कार्ड’ नुकतेच जाहीर केले. यामध्ये काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी प्रथम क्रमांक पटकवला, तर आमदार असलम शेख आणि आमदार डॉ. ज्योती गायकवाड अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिल्या. घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडणे, विधानसभेतील उपस्थिती, नागरिकांचे प्रश्न मांडणे आणि कामकाजात सहभाग या निकषांवर ही क्रमवारी ठरवण्यात आल्याचा दावा प्रजा फाउंडेशनने केला आहे. मात्र, या रिपोर्ट कार्डच्या पारदर्शकतेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रिपोर्ट कार्ड जाहीर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रजा फाउंडेशनच्या या मूल्यमापन पद्धतीवर जोरदार आक्षेप घेतला. मुंबईसारख्या महापालिकेत व विधानसभेत इतर पक्षांचेही अनेक आमदार सक्रिय असताना, पहिल्या तिन्ही क्रमांकांवर केवळ एकाच पक्षाचे आमदार कसे काय येऊ शकतात, असा खरमरीत सवाल पत्रकारांनी उपस्थित केला.
पत्रकारांच्या या थेट प्रश्नांमुळे प्रजा फाउंडेशनच्या प्रतिनिधींची चांगलीच अडचण झाली. या घटनेमुळे प्रजा फाउंडेशनचा हा अहवाल निष्पक्ष नसून संताप व्यक्त केला जात आहे:
पारदर्शकतेचा अभाव: अहवाल तयार करताना वापरण्यात आलेली आकडेवारी आणि गुणांकन पद्धती खरोखरच सर्वसमावेशक आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
एकतर्फी निष्कर्ष: सर्वपक्षीय आमदारांच्या कामगिरीचे तटस्थपणे विश्लेषण करण्याऐवजी एकाच राजकीय पक्षाच्या आमदारांना अव्वल श्रेणी देणे ही संस्थात्मक निष्पक्षतेची पायमल्ली असल्याची टीका होत आहे.
