विशेष प्रतिनिधी | मुंबई
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मुंबईत ‘पादचारी प्रथम’ अंतर्गत पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याची धडक मोहीम वेगाने सुरू आहे. शहरातील रस्ते व पादचारी मार्ग मोकळे करण्यासाठी महापालिकेच्या ए-वॉर्डसह विविध विभागांकडून अनधिकृत बांधकामे व बेकायदा फेरीवाल्यांवर कठोर कारवाई केली जात आहे.
मात्र, संपूर्ण शहरात ही धडक मोहीम राबवली जात असताना, दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक व पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कुलाबा भागात या कारवाईचा प्रभाव अपुरा पडत असल्याचे चित्र आहे. कुलाबा कॉजवे व आसपासच्या मार्गांवर आजही स्टॉल्स आणि फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम असल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे.
पालिकेची पथके कारवाईसाठी येतात तेव्हा फेरीवाले काही काळासाठी पसार होतात, परंतु पथक निघून जाताच पुन्हा स्टॉल्स मांडले जातात. या ‘दिखाऊ’ कारवाईमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. कुलाब्यातील पदपथ पूर्णपणे मोकळे करण्यासाठी पालिकेने तात्पुरत्या दंडात्मक कारवाईऐवजी २४ तास पाळत ठेवणारी विशेष यंत्रणा तैनात करावी, अशी ठाम मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
