मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) पर्जन्य जलवाहिनी विभागातील दुय्यम अभियंता विशाल भालचंद्र वाणी यांना महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) २ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
तक्रारदाराच्या बांधकाम प्रकल्पासाठी ड्रेनेज परवानगी मिळवण्यासाठी वाणी याने सुरुवातीला १० लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने रक्कम कमी करण्याची विनंती केल्यानंतर ही रक्कम २.५ लाखांवर बसली. तक्रारदाराने २२ एप्रिलला एसीबीकडे तक्रार नोंदवली.
एसीबीने तक्रारीची खातरजमा करून सापळा रचला. २४ एप्रिल रोजी ठरलेल्या ठिकाणी वाणी याने लाच स्वीकारली तेव्हा एसीबी पथकाने त्याला अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुषमा खोत यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण पावले यांच्या मार्गदर्शनात पार पडली.

