‘
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कबड्डी दिग्गजांना मानाचा मुजरा
मुंबई, दि. १२ (क्री.प्र.) : ‘कबड्डी कबड्डी’च्या घुमणार्या जयघोषात श्रमिक जिमखान्याच्या लाल मातीत जणू काळ थांबला आणि सहा दशकांच्या आठवणी पुन्हा एकदा प्रत्येकाच्या मनात दरवळल्या. कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या श्रमिक जिमखान्याने आपल्या हीरक महोत्सवी सोहळ्यात केवळ कार्यक्रम नाही, तर एक जिवंत इतिहासच साकारला. विशेष म्हणजे श्रमिकच्या एका हाकेला प्रतिसाद देत अवघं कबड्डी विश्व या पावन भूमीत एकवटलं आणि या मातीत घाम गाळणार्या, झटणार्या, जिंकणार्या प्रत्येक दिग्गजाच्या कर्तृत्वाला अभिमानाने मानवंदना देत शनिवारची संध्याकाळ संस्मरणीय ठरली.
‘कबड्डी कबड्डी’तून पुन्हा उभा राहिला ६० वर्षांचा प्रवास
आमदार सुनील शिंदे यांच्या संकल्पनेतून, वरळीच्या अमरप्रेम क्रीडा मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त तबेला मैदान ते श्रमिक जिमखाना हा ६० वर्षांचा प्रवास ‘कबड्डी कबड्डी’च्या दमदार जयघोषात पुन्हा जिवंत झाला. साध्या कार्यकत्यापासून अर्जुनवीरांपर्यंत सार्यांनाच एका मंचावर पाहण्याचा दुर्मिळ योग या सोहळ्यानिमित्त अनुभवायला मिळाला.
या सोहळ्याच्या प्रत्येक दमात इतिहासाची चाहूल होती आणि प्रत्येक श्वासात त्या मातीतल्या आठवणींची ऊब होती.
लाल मातीचा कलश… दिग्गजांच्या आयुष्यभराच्या समर्पणाला मानाचा मुजरा
ज्या लाल मातीत खेळाडूंनी आयुष्य झोकून दिलं, त्याच मातीतून उचललेला कलश जेव्हा दिग्गजांच्या हाती सोपवण्यात आला, तेव्हा तो क्षण केवळ सन्मानाचा नव्हता. तो त्यांच्या घामाचा, त्यागाचा आणि संघर्षाचा अश्रूंनी न्हालेला मानाचा मुजरा होता. अमरप्रेम क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राणाप्रताप तिवारी यांच्या हृदयस्पर्शी निवेदनाने वातावरण भारावलं आणि अनेकांच्या डोळ्यांत आठवणींचे अश्रू दाटून आले.
दिग्गज, कर्णधार आणि उद्धव ठाकरे यांची भावस्पर्शी भेट
मुंबईच्या कबड्डी इतिहासातील सुवर्ण क्षणांना उजाळा देताना गत सहा दशकांतील महिला आणि पुरुष कर्णधारांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी टिपलेले क्षण हे केवळ फोटो नव्हते, ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहवासाच्या आठवणींना दिलेला जिवंत सलाम होता.
कबड्डीतले पहिले अर्जुन पुरस्कार विजेते सदानंद शेट्ये, शांताराम जाधव, शंकुतला खटावकर, राजू भावसार, अशोक शिंदे आणि कबड्डीचा ‘वाघ’ म्हणून ओळखले जाणारे वसंत सूद यांचा झालेला सत्कार म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाला दिलेला मनापासूनचा प्रणाम होता.
‘कबड्डी कुटुंब’ अधिक घट्ट, प्रत्येक हाताचा सन्मान
शिवछत्रपती पुरस्कार विजेते, प्रशिक्षक, हाडवैद्य, पत्रकार आणि पडद्यामागे राबणारे कार्यकर्ते अशा प्रत्येकाचा सन्मान होताना ‘कबड्डी कुटुंब’ ही भावना अधिक दृढ झाली. मैदान उभं करणार्या हातांपासून ते खेळाला शिखरावर नेणार्या खेळाडूंपर्यंत प्रत्येकाला दिलेला मान हा कबड्डीच्या अखंड प्रवासाचा उत्सव ठरला.
नऊवारीतल्या रणरागिणींची रॅम्प चढाई
श्रमिकच्या महोत्सवाला आधुनिकतेची जोड देताना मुंबईच्या महिला कबड्डीपटूंनी नऊवारी साडीत सादर केलेली रॅम्प चढाई हा खास आकर्षण ठरला. नृत्यदिग्दर्शक गुरु कोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ललिता सुर्वे, लता कंटक, प्रतिमा मांजरेकर, जयश्री सुवर्णा, मनीषा गावंड, तृप्ती सुवर्णा, हिमाली नार्वेकर, हर्षदा नलावडे, दीपा पेडणेकर आणि सोनम पोळे यांनी ‘ए राजे जी रं जी’ या गीतावर सादर केलेल्या देखण्या सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकली.
शिक्क्यांच्या ठशात आणि लिंबाच्या गोळ्यांत पुन्हा जगल्या आठवणी
श्रमिकमध्ये प्रवेश करताच स्वयंसेवकांनी मनगटावर शिक्का मारत आणि हातात लिंबाच्या गोळ्या देत केलेलं स्वागत आणि क्षणात काळ जणू मागे फिरला! ‘स्टॅम्प इथे मारा’ म्हणत दिग्गजही बालपणीच्या आठवणीत हरवले. मैदानावरचे ते निरागस क्षण पुन्हा जिवंत झाले. हा सोहळा केवळ महोत्सव नव्हता.
तो नात्यांचा, आठवणींचा आणि अभिमानाचा उत्सव होता. श्रमिकच्या लाल मातीत रुजलेली कबड्डीची नाळ आजही तितकीच जिवंत आहे आणि ती कधीही तुटणार नाही, याची जाणीव प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजवणारा हा सोहळा ठरला.

