देवळा: बँकेत तारण ठेवलेल्या सोन्याच्या खोट्या शुद्धता अहवालांनी देमको बँकेची ५४ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक केलेल्या पाच संशयितांना देवळा पोलिसांनी सोमवार (६ एप्रिल) अटक केली. कळवण न्यायालयाने त्यांना १५ दिवसांची कोठडी सुनावली असून, ते जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दाखल झाले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील यांनी ही माहिती दिली.
बँक व्यवस्थापक सुनील भालेराव यांच्या ५ जुलै २०२४ च्या फिर्यादीनुसार, व्हॅल्यूअर राजेंद्र सोनवणे (५०, कापशी) यांनी सप्टेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान २७ खातेदारांच्या संगनमताने सदोष व बनावट सोने तारण ठेवले. शुद्ध सोने असल्याचा खोटा अहवाल सादर करून बँकेकडून ५४.७४ लाखांचे कर्ज मिळवले. यात कापशी (६), गुंजाळनगर (६), देवळा (५), सुभाषनगर व रामेश्वर (प्रत्येकी २) तसेच भिलवाड, वाखारवाडी, पिंपळगाव, सरस्वतीवाडी व वरवंडी (प्रत्येकी १) येथील खातेदारांचा समावेश.
पोलिसांनी नारायण पवार (गुंजाळनगर), मुकेश निकम (वाखारवाडी), युवराज मेधने (सरस्वतीवाडी), बापू खैर (सुभाषनगर) व सुरेश पगार (रामेश्वर) या पाचांना अटक केली. पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नंदा पाटील तपास करत आहेत. बँक पदाधिकारी व सभासदांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.

