मंगळवारी अचानक व्हॉट्सअपवर एक बातमी आली. सचिन तेंडुलकरने पहिले शतक ज्याच्या बॅटने ठोकले ते अनिल गुरव यांचे निधन. नकळत डोळे पाणावले. कारण काही बातम्या अशा असतात की त्या वाचताना शब्द दिसतात, पण मनात चित्रं उभी राहतात. अनिल गुरव यांची बातमी तशीच होती. जे कधी हिंदुस्थानसाठी क्रिकेट खेळले नाहीत. पण ज्यांचं नाव घेताना आजही क्रिकेटच्या गल्ल्यांमध्ये एक हळवा कोपरा कायम असतो. अनिल गुरव सचिन तेंडुलकरपेक्षा चांगले खेळायचे.
८० च्या दशकात मुंबईच्या गजबजलेल्या मैदानांवर एक मुलगा होता. बॅट हातात घेतली की त्याच्या फटक्यांत एक बेफिकीरी असायची. कट आणि हुकचा आवाज कानात घुमायचा. जणू चेंडूला आदेश देणारे फटके होते. त्या काळात त्यांना मुंबईचा विव्ह रिचर्डस म्हटलं जायच्ें. ते उगाच नव्हतं. ते फक्त रिचर्डससारखे दिसायचे असे नाही. त्यांची चालही तश्शीच कातिल होती आणि फटकेही तसेच होते. ते किती खेळले, याची कुणाला फारशी कल्पना नसेल. पण ज्यांनी त्यांना पाहिलं ते आजही त्यांची चाल आणि खेळ विसरलेले नाहीत.
आचरेकर सरांच्या नेट्समध्ये अनेक मुलं घडत होती, पण काहीजण नजरेत भरायची. त्यापैकी एक अनिल होते. सचिन तेंडुलकरसारख्या मुलाला त्याची बॅटिंग पाहायला सांगितली जायची. सचिन त्याला ‘सर’ म्हणायचा आणि अनिल हसत म्हणायचे, बॅट घे, पण शतक ठोकायचं. हे शब्द सचिनही विसरलेला नसेल.
मोठा फलंदाज होण्याची ताकद असलेल्या अनिलची स्वप्नं अत्यंत साधी होती. फक्त हिंदुस्थानसाठी खेळायचं होते. तेव्हा सगळ्यांना वाटायचं की अनिल सगळ्यांच्या आधी त्या कॅपपर्यंत पोहोचेल, पण आयुष्याला कधी क्रिकेटचे नियम कळत नाहीत. तो कधी पंचासारखा बोटवर करेल आणि विकेट काढेल, हे कुणीही सांगू शकत नाही.
अनिल यांची दोन रुपं होती. एक मैदानावरचं आणि दुसरं मैदानाबाहेरचं. मैदानावर ते बेधडक-बिनधास्त होते, पण मैदानाबाहेर ते एक घाबरलेला आणि भेदरलेला मुलगा होता. गँगस्टर असलेल्या मोठ्या भावाच्या सावलीने त्यांना असा वेढा घातला, की त्यांच्या स्वतःच्या ओळखीचं अस्तित्वच हरवायला लागलं. पोलिसांच्या पावलांचा आवाज त्यांच्या स्वप्नांवर वारंवार आदळत राहिला. कधी ते आणि त्यांची आई पोलीस स्टेशनमध्ये. कधी चौकशी.कधी भीती. पोलीसांचा ससेमिरा कायमच मागे राहिला. भाऊ गँगस्टर असल्याचे परिणाम.
भावाच्या सावलीतून मुक्त होण्यासाठी त्यांनी घर बदललं. आयुष्य बदलण्याचा प्रयत्न केला. पण नशिबाने त्याचा पत्ता कायम ठेवला. आणि मग एक दिवस, एक चूक झाली. ज्याला शोधत होते तो नव्हता, पण ज्याला पकडलं तो अनिल होता. पकडल्यानंतर पोलीसांनी दिलेल्या फटक्यांनी शरीराला इतक्या जखमा दिल्या की त्या मनावरही खोलवर झाल्या. तेव्हाच एक फलंदाज कायमचा तुटला. बॅट हातात घेण्याची ताकद उरली नाही. क्रिकेट त्यांच्यापासून दूर गेलं नाही. तेच क्रिकेटपासून कायमचे दूर गेले.
कधी काळी ज्यांच्या फटक्यांवर मुलं टाळ्या वाजवायची, तोच अनिल पुढे गल्लीत एकटाच दिसू लागला. लोक त्याच्याकडे पाहायचे, पण कुणीही ओळखत नव्हते. तेसुद्धा कुणाला ओळख दाखवत नव्हते. त्यांचा खेळ आणि ओळख दोन्ही काळाच्या ओघात पुसून गेली होती. तेव्हा एक गोष्ट सतावत होती, बॅट होती, टॅलेंट होतं, पण नशिबाची साथ नव्हती.
त्याच्या आठवणीत मात्र एक छोटा प्रसंग कायम राहिला. एक लाजरा मुलगा, जो स्वतः बॅट मागायला यायचा नाही. दुसर्याला पाठवायचा. तोच मुलगा पुढे जगाचा ‘सचिन’ झाला. अनिलही ते अभिमानाने सांगायचे, तो माझ्याकडे यायचा. शिकायचा आणि हो, शतकही करायचा.
शेवटी इतकंच सुचतेय. काही खेळाडू निवृत्त होतात. काही बाद होतात. पण काहीजण कधी आपली इनिंगही सुरु करू शकत नाहीत. त्यापैकी एक अनिल गुरव होते. त्यांची शेवटची इनिंग कुठल्याही स्टेडियमवर झाली नाही. ना टाळ्यांचा कडकडाट होता, ना स्कोअरबोर्ड. फक्त गल्लीतल्या काही लोकांच्या आठवणी होत्या… आणि एक हळवा प्रश्न, जर त्याला थोडी साथ मिळाली असती, तर… ?
काल ते गेले. क्रिकेटचा हरवलेला हिरा गेला. शांतपणे. गोंगाटाशिवाय. त्यांच्या जाण्याची ना हेडलाइन्स झाली, ना त्यांच्यासाठी श्रद्धांजलीची रांग लागली. पण शिवाजी पार्कच्या मातीला विचाराल, तर ती सांगेल. एक फलंदाज होता… ज्याच्या फटक्यांत एक स्वप्न होतं.
मंगेश वरवडेकर

