पुणे/काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या टिपू सुलतान विषयी करण्यात आलेल्या वक्तव्यानंतर करण्यात आलेलं पुण्यातील आंदोलन आता भाजप आणि काँग्रेसलाही भोवण्याची शक्यता आहे. या आंदोलन प्रकरणी दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना विरोधात दिलेल्या तक्रारीनंतर दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे आणि युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्यासह 100 जणांवर पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भाजपने दिलेल्या तक्रारीनंतर, काँग्रेसचे अरविंद शिंदे, प्रशांत जगताप यांच्यासह इतर काँग्रेस कार्यकर्त्यांवर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून भाजपने आंदोलन केलं आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसनेही आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे आता दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानंतर भाजपनं त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस भवन परिसरात आंदोलन केलं.
भाजपच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्तेही मैदानात उतरले. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी भाजपकडून दगडफेक झाल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. यात काँग्रेसचे काही कार्यकर्ते जखमी झालेत. तर महिला पोलीस कर्मचारीही या राड्यादरम्यान जखमी झाल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांना शांत करण्यासाठी आलेल्या पुणे पोलीस आयुक्त आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. अखेर काही वेळानंतर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना शांत करण्यात पोलिसांना यश आलं.
छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्यासोबत केल्याच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात पुण्याच्या पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी याबाबत फिर्याद दिली. घाटे यांच्या या फिर्यादीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

