शिराळा- मौजे टाकवे ग्राम विकास मंडळ, मुंबई यांच्या व्यवस्थापनाखालील टाकवे हायस्कूल, शिराळा तालुका (जिल्हा सांगली) येथील एक प्रसिद्ध शैक्षणिक संस्था आहे. या शाळेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रवेशासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कार्यकारणी आणि शिक्षक यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाशी (एसटी) संपर्क साधून पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बससेवा सुरू करण्यात आली. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना रोजच्या प्रवासासाठी सुरक्षित आणि स्वस्त पर्याय उपलब्ध झाला. पूर्वी विद्यार्थ्यांना वाहतुकीसाठी खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागायचे, एसटी बससेवा सुरू झाल्याने हा पालकांचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. स्थानिक पालक आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून परिसरात अशा प्रयत्नांना प्रोत्साहन मिळण्यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
शिराळा एसटी डेपो मार्फत नविन एसटी सुरू करण्याकमी मौजे टाकवे ग्रामविकास मंडळ, मुंबई कार्यकारणी २०२४ च्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून दिनांक 29 डिसेंबर 2025 पासून नवीन एसटी सुरू करण्यात आली आहे. मौजे टाकवे ग्रामविकास मंडळ, कार्यकारणी २०२४ चे पदाधिकारी अध्यक्ष अर्जुन मोहिते, उपाध्यक्ष हेमंत जाधव, कार्याध्यक्ष मोहन रावते, सरचिटणीस सुनिल राऊत, संयुक्त सरचिटणीस भगवान रावते, खजिनदार प्रकाश रावते, सहखजिनदार किसन जाधव, लक्ष्मण कोरडे, सदस्य बाळकृष्ण रावते, राजेंद्र रावते, सूर्यकांत रावते , शंकर जाधव , नामदेव रावते व टाकवे हायस्कूल, टाकवे मध्ये कार्यरत सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ यांचे अमूल्य योगदान लाभले.
ही सेवा शिराळा ते पुदेवाडी – बांबवडे – पाचुंब्री – शिवरवाडी तसेच त्याच मार्गाने परत शिराळा या मार्गावर विद्यार्थ्यांसाठी नवीन एसटी सेवा चालू झाल्यामुळे शिराळ्याला जाणे येणे नागरिकांना देखील सोयीचे फायदा होणार आहे तसेच नागरिकांचा प्रवासाचा बराचसा त्रास कमी होणार आहे.


