होम्स( सीरिया)/शुक्रवारी सीरियातील होम्स शहरात नमाजच्या वेळी एका मशिदीत मोठा बॉम्बस्फोट झाला. या हल्ल्यात आतापर्यंत ८ लोकांचा मृत्यू झाला असून किमान १८जण जखमी झाल्याचे समोर येत आहे. अलावी समुदायाच्या मशिदीत हा स्फोट झाला आहे. अलावी हा सीरियातील एक अल्पसंख्याक समुदाय आहे. सरकारी वृत्तसंस्था सनाने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट होम्स शहराच्या ‘वादी अल-दहाब’ भागातील ‘इमाम अली बिन अबी तालिब’ मशिदीत झाला. देशाच्या आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या हल्ल्यात किमान १८ लोक जखमी झाले आहेत
सीरियाच्या गृह मंत्रालयाने या घटनेला ‘दहशतवादी हल्ला’ म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, शुक्रवारी नमाजच्या वेळी मशिदीला लक्ष्य करण्यात आले. अल जजीराच्या वृत्तानुसार, ही मशीद इस्लामच्या अलावी पंथाशी संबंधित आहे. सीरियातील बहुसंख्य मुस्लिम लोकसंख्येत अलावी अल्पसंख्याक गट आहे. हा हल्ला सध्याचे राष्ट्राध्यक्ष अहमद अल-शरा यांच्या नेतृत्वाखालील सीरियन बंडखोर सैन्याने दमिश्कवर ताबा मिळवल्यानंतर एका वर्षाने झाला आहे. शरा यांनी बशर अल-असद यांना सत्तेतून हटवले होते. असद हे अलावी समुदायाचे होते आणि गेल्या वर्षी त्यांची सत्ता गेल्यानंतर ते रशियाला पळून गेले होते.
गेल्या एका वर्षात, सीरियन सुरक्षा दलांनी पूर्वीच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या अलावी मिलिशियाशी लढा दिला आहे. मात्र, सीरिया तील मोठा समुदाय आणि इतर अल्पसंख्याक गट इस्लामिक स्टेट या संघटनेच्या हल्ल्यांचे बळी ठरत आहेत. आयएस या संघटनेने २०१४मध्ये सीरिया आणि इराक मध्ये ‘खलिफा’ स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. २०१७ मध्ये त्यांना पूर्णपणे हरवण्यात आले होते, पण त्यांचे छोटे गट पुन्हा एकत्र आले आहेत आणि देशात सक्रिय आहेत.

