महाड/ रायगड जिल्ह्यातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सोशल मीडियाबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. नागरिकांना जाहीर इशारा देण्यात आला आहे. मतमोजणी दरम्यान तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या अफवा, चिथावणीखोर, वादग्रस्त किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, कमेंट, व्हिडीओ, ऑडिओ, बॅनर प्रसारित करू नयेत, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, राजकीय, सामाजिक किंवा धार्मिक व्यक्ती, गट अथवा समाजाच्या भावना दुखावणाऱ्या आशयावर ‘शून्य सहनशीलता’ ठेवण्यात येणार आहे. अशा प्रकारचा मजकूर तयार करणे, पोस्ट करणे किंवा फॉरवर्ड करणे हे कायद्याने दंडनीय ठरणार आहे. संबंधित व्यक्तीविरोधात तात्काळ कारवाई केली जाईल. विशेष म्हणजे, केवळ पोस्ट करणारी व्यक्तीच नव्हे तर ती पोस्ट शेअर करणारे ग्रुप सदस्य आणि संबंधित व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडिया ग्रुपचे अॅडमिन यांनाही जबाबदार धरले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.या पार्श्वभूमीवर, सर्व सोशल मीडिया ग्रुप अॅडमिनना मतमोजणी आणि निकालाच्या कालावधीत ओन्ली ॲडमिन सेटिंग सुरू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे कोणताही ग्रुप सदस्य वादग्रस्त किंवा भडक पोस्ट टाकणार नाही, याची खबरदारी घेता येईल. प्रशासनाने याबाबत अॅडमिननी सहकार्य न केल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे ठामपणे सांगितले आहे
दरम्यान, रायगड जिल्ह्यात सायबर सेलचे विशेष पथक सक्रिय करण्यात आले असून फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, एक्स (ट्विटर) आदी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर २४ तास लक्ष ठेवले जात आहे. कोणतीही अफवा, खोटी माहिती किंवा समाजात तणाव निर्माण करणारा मजकूर आढळल्यास तात्काळ त्याची दखल घेतली जाणार असून गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.लोकशाहीचा हा महत्त्वाचा टप्पा शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत पार पडावा, यासाठी नागरिकांनी संयम बाळगावा, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही संशयास्पद पोस्ट आढळल्यास ती पुढे न पाठवता प्रशासनाच्या निदर्शनास आणावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून करण्यात आले आहे. मतमोजणीच्या दिवशी शांतता आणि सुव्यवस्था राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

