पालघर /पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या अंडर-१६ फुटबॉल संघात आपलं कौशल्य सिद्ध केलेल्या एका खेळाडूचा मृतदेह आढळला आहे. सागर सोरती असं या खेळाडूचं नाव आहे. या घटनेमुळं मोठी खळबळ उडाली आहे. या खेळाडूचा मृतदेह पालघर जिल्ह्यातील मेंढवण खिंड जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेमागे आत्महत्येचा संशय व्यक्त केला आहे, मात्र, या तरुण खेळाडूच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या मृत्यूने क्रीडा क्षेत्रातील अनेकांना धक्का बसला आहे. या घटनेची नोंद कासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
सागर सोरती या खेळाडूचा मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. मुंबईच्या अंडर-१६ फुटबॉल संघात आपलं कौशल्य सिद्ध केलेल्या खेळाडूनं एवढं टोकाचं पाऊल कसं उचललं असावं? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सागर सोरती हा १५नोव्हेंबर रोजी आपल्या घरातून निघाला होता. त्याने कुटुंबीयांना पुण्याला फुटबॉल खेळायला जात आहे असे सांगितले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच १६ नोव्हेंबरपासून त्याचा कुटुंबाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली असतानाच, दोन दिवसांनंतर, १८ नोव्हेंबर रोजी पालघरमधील मेंढवण खिंडच्या घनदाट जंगलात पोलिसांना त्याचा मृतदेह एका झाडाला दोरीने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी त्याचा मोबाईल फोन असल्याने पोलिसांना तातडीने त्याची ओळख पटवणे शक्य झाले.
घटनेनंतर सागरच्या कुटुंबियांनी पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे. सागर गेल्या जवळपास दोन वर्षांपासून तीव्र मानसिक तणावाखाली होता. याच महिन्यात त्याच्या लहान भावाचे लग्न ठरले होते, परंतु त्याने त्या लग्नासाठी नवीन कपडे शिवण्यासही स्पष्ट नकार दिला होता. या मानसिक तणावामुळेच त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

