पुणे/ कांदिवलीतील बारमुळे अगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले रामदास कदम यांचे चिरंजीव आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम पुन्हा नव्या वादात सापडले आहेत. कदम यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांचा आदेश डावलून पुण्यातील कुख्यात गुंड निलेश धायवळ याच्या भावाला शस्त्र परवाना दिल्याचे उघडकीस आले आहे.आता या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून योगेश कदम यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश धायवळ याच्यावर खंडणी,खून, अपहरण यासारखे गंभीर गुन्हे आहेत. सध्या एका हत्येच्या प्रकरणात ते अडकलेला असतानाच देश सोडून विदेशात पळाला आहे.दरम्यान नीलेशचा भाऊ सचिन धायवळ हा सुधा त्याच्या भावासोबत असतो.अशी चर्चा असतानाच सचिन धायवळ याने पुणे पोलिसांकडे शस्त्र परवाना मागितला होता.आपल्याकडे आर्थिक व्यवहाराशी संबंधित मोठी रक्कम नेहमी असते त्यामुळे सुरक्षेसाठी शस्त्र परवान्याची आवश्यकता आहे.असे कारण सचिनने आपल्या अर्जात नमूद केले होते मात्र पुणे पोलिसांनी चौकशी करून एक अहवाल तयार केला आणि सचिनला शस्त्र परवाना नाकारला .त्यामुळे त्याने अपील केले .याच अपिलावर झालेल्या सुनावणीदरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपले वजन वापरून पोलिस आयुक्तांचा अहवाल बाजूला ठेवून सचिनला शस्त्र परवाना देण्याचे आदेश दिले.एका कुख्यात गुंडाच्या भावाला नियम डावलून अशा तऱ्हेने शस्त्र परवाना दिल्याने योगेश कदम वादाच्या भोवऱ्यात सापडले असून विरोधकांनी योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
