नवी दिल्ली/पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात उज्ज्वला योजनेची सुरुवात केली होती. याअंतर्गत देशातील लाखो महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले होते. आता सरकारने या योजनेच्या विस्ताराला परवानगी दिली आहे. याअंतर्गत आता आणखी २५ लाख महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन दिले जाणार आहे. सरकारने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने २०२५/२६ या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत २५ लाख नवीन एलपीजी कनेक्शन देण्यास मंजूरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर मंत्री हरदीप सिंग पुरी यांची पोस्ट शेअर करत लिहिले की, “नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर, मी उज्ज्वला कुटुंबाशी संबंधित सर्व माता आणि भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो. सरकारचे हे पाऊल या शुभ मुहूर्तावर केवळ आनंद देणार नाही तर महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आपला संकल्पही बळकट करेल.” सरकारच्या या निर्णयानंतर उज्ज्वला कुटुंबातील सदस्यांची संख्या १०.६० कोटींवर पोहोचणार आहे.केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, “नवरात्रीच्या सुरुवातीलाच, उज्ज्वला योजनेअंतर्गत २५लाख डिपॉझिट-फ्री गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिलांचा आदर करण्याच्या वचनबद्धतेचा आणखी एक पुरावा आहे. यामुळे माता आणि बहिणींचा आदर आणि सक्षमीकरण करण्याचा आमचा संकल्प आणखी दृढ होत आहे.’ असेही ते म्हणाले

