पुणे/पुण्यातील एमपी एम एल ए कोर्टाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल असलेल्या मानहानिकारक बाबीच्या खटल्यात एक धक्कादायक निर्णय दिला आहे. न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील न्यायालयाने फिर्यादीची याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेमध्ये राहुल गांधींवर मानहानिचा दावा करण्यात आला होता. तसेच त्यांच्या भाषणाची सीडी पुरावा म्हणून सादर करण्यात आली होती. पण ऐन वेळी ही सीडी रिकामी असल्याचे आढळले.
प्रकरण विनायक दामोदर सावरकर यांचे पुतणे सत्यकी सावरकर यांनी दाखल केले आहे. त्यांनी आरोप केला आहे की, मार्च २०१३ मध्ये लंडनमध्ये दिलेल्या भाषणात राहुल गांधींनी सावरकरांबद्दल अपमानजनक टिप्पणी केली होती. मात्र, आरोपासोबत सादर केलेली भाषणाची सीडी पूर्णपणे रिकामी आढळली.सत्यकी सावरकर यांची मुख्य साक्ष (एक्झामिनेशन-इन-चीफ) सुरू असताना प्राथमिक पुरावा म्हणून सादर केलेली कॉम्पॅक्ट डिस्क (सीडी) कोर्टात चालवली गेली, पण ती प्ले होऊ शकली नाही. यानंतर फिर्यादीचे वकील अॅड. संग्राम कोल्हटकर यांनी तात्काळ न्यायालयाकडे विनंती केली की, २०२३ मध्ये तक्रारीसोबत जमा केलेल्या मूळ यूट्यूब लिंकवरून व्हिडीओ थेट चालवला जावा. कोल्हटकर यांचा दावा होता की, ही सीडी पहिल्यांदा दाखल करताना आणि दखलपात्र टप्प्यात दुसऱ्या न्यायाधीशांसमोर सादर करताना पूर्णपणे व्यवस्थित होती आणि याच आधारावर राहुल गांधींना समन्स बजावण्यात आले होते.
कोल्हटकर पुढे म्हणाले, “आता हा संशोधन किंवा तपासाचा विषय आहे. आम्ही विनंती करतो की, हरवलेल्या पुराव्याबाबत न्यायालयाने न्यायिक चौकशी व तपास करावा. सीडी उपलब्ध नाहीत किंवा त्या कुठेतरी हरवल्या असाव्यात, हे आम्हाला माहीत नाही.” असे ते म्हणाले

