लाडकी बहीण योजनेतील महिलांची छाननी सुरू – २६ लाख बोगस लाभार्थ्यांवर कारवाई होणार
मुंबई//राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या २६ लाख महिला या अपात्र ठरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपात्र लाभार्थ्यांची आता जिल्हास्तरीय सुक्ष्म छाननी सुरू असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. या छाननीतून अपात्र ठरलेल्या महिलांवर योग्य ती कारवाई होईल असंही त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे २६ लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करुन दिली होती. सदर सुमारे २६ लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत.
त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सुक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरु आहे. छाननीअंती या लाभार्थींची पात्रता/अपात्रता स्पष्ट होणार आहे.
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. सरकारने राबविलेल्या शोधमोहिमेमध्ये तब्बल २६ लाख ३४ हजार बोगस लाभार्थी आढळले आहेत. हे सर्व लाभार्थी प्रत्यक्षात पात्र नसतानाही दरमहा १५०० रुपयांचा निधी घेत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सरकारची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर तोडगा म्हणून राज्यभरातील सर्व पात्र लाभार्थ्यांची पुन्हा एकदा ई-केवायसीद्वारे पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या योजनेत एकूण २ कोटी ६३ लाख महिलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ कोटी ४१लाख महिला पात्र ठरल्या. विधानसभा निवडणुकीनंतर शिल्लक राहिलेल्या ११लाख अर्जांची तपासणी केल्यानंतर ७ लाख ७६ हजार अर्ज अपात्र ठरले. जून महिन्यात सरकारने या योजनेचा सखोल आढावा घेण्याचे ठरवले. महिला व बालकल्याण विभागाने सर्व विभागांकडून माहिती मागविल्यानंतर फसवणुकीचा मोठा प्रकार समोर आला.
