मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस लोटले तरी महायुतीला अद्याप आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवता आला नाही. महायुती अर्थात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने १ मुख्यमंत्री व २ उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला तयार केला आहे.
आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानुसार विजय रुपाणी मंगळवारी सायंकाळी, तर निर्मला सीतारामन ४ डिसेंबर रोजी सकाळी मुंबईत पोहोचतील.४ डिसेंबर रोजी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्यात नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची निवड केली जाईल. त्यानंतर ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा. मुंबईच्या आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी पार पडेल
भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित केले आहे. पण ऐनवेळी भाजप धक्कातंत्र राबवण्याचीही शक्यता आहे. अजित पवार व देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत अमित शहा यांची भेट घेणार होते. पण फडणवीस यांनी अचानक आपला दौरा रद्द केला आहे. त्यामुळे अजित पवार एकटेच दिल्लीला गेलेत. यापूर्वी २८ नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे, फडणवीस आणि पवार हे तिघेही दिल्लीला गेले होते.दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३० जागा मिळाल्यात. १४५ हा बहुमताचा जादुई आकडा आहे. या आकड्याहून ८५ जास्त जागा महायुतीला मिळाल्या आहेत. महायुतीला भाजपला १३२ , शिवसेनेला ५७ व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्यात

