ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवत असलेल्या बेस्ट पतपेढीत मोठा आर्थिक घोटाळा! चौकशी सुरू
मुंबई/ठाकरे बंधू एकत्र येऊन निवडणूक लढवत असलेल्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची एन्ट्री झाली आहे बेस्ट कर्मचारी पतसंस्थेची १२ कोटी ४० लाखांना फसवणूक केल्याचा तक्रारीत आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून संचालक मंडळाची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.
बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. ही निवडणूक १८ ऑगस्टला होणार आहे. बेस्ट पतपेढीवर गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व आहे. त्याआधीच आता पोलिसांनी चौकशी सुरू केल्याने त्यामागे काही राजकारण आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
दुय्यम निबंधकाची परवानगी न घेता लोणावळा येथील विश्रामगृह अवाच्यासव्वा दरात खरेदी केल्याचा आरोप संचालक मंडळावर होत आहे. विश्रामगृहाची किंमत दुय्यम निबंधकाने रेडिरेकनरच्या दरानुसार ५.६३ कोटी रुपये ठरवली असताना विश्रामगृह १८ कोटींना विकत घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे.पतसंस्थेतील सभासदाच्या तक्रारीवर संचालक मंडळाची आर्थिक गुन्हे शाखेकडून प्राथमिक चौकशी सुरू झाल्याची माहिती आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना संचालक मंडळ चौकशीच्या फेऱ्यात सापडल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.
मुंबईत बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची एकत्रित बैठक पार पडली. बेस्टच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत. बैठकीला संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आणि बेस्ट युनियनच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
