मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये मराठीची गळचेपीमराठीतील पोलिस -एफआयआर स्वीकारण्यास युनियन बँकेचा नकार
नागपूर : मराठीसाठी महाराष्ट्रात आंदोलने सुरू असतानाच केवळ मराठीत एफआयआर केला म्हणून युनियन बँकेने एका अपघातप्रकरणात नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे.विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये हा संतापजनक प्रकार घडलाय.
घरातील एकमेव कमावत्या तरुणाच्या मृत्यूनंतर नुकसानभरपाई मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या त्याच्या गरीब कुटुंबाची जर भाषेपायी अडचण केली जात असेल, तर तुम्ही काय म्हणणार? जर कागदोपत्री पुरावे ( पोलिस एफआयआर ) मराठीत आहे, फक्त या कारणासाठी तरुण मुलगा गमावलेल्या कुटुंबाला मुलाच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या नुकसानभरपाईच्या हक्कापासून वंचित ठेवले जात असेल, तर तुम्ही काय म्हणणार? भाषेपायी अशी संतापजनक अडवणूक नागपूरच्या बोपचे कुटुंबीयांची केली जात आहे. हे बेजबाबदार वर्तन यूनियन बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेकडून केले जात आहे.
नागपूरच्या योगेश बोपचे या तरुणाचा ८ जूनच्या पहाटे एका रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. योगेशचा कुठलाही जीवन विमा नसल्यामुळे त्याची पत्नी आणि दोन मुलं उघड्यावर पडले. एका सुशिक्षित कौटुंबिक मित्राने राष्ट्रीयकृत बँकेत बँक खाते आणि त्याचा एटीएम कार्ड असल्यास रस्ते अपघाताच्या मृत्यू संदर्भात दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई पीडित कुटुंबीयांना मिळू शकते अशी माहिती दिली.
ही माहिती मिळाल्यानंतर दिवंगत योगेशचा लहान भाऊ लोकेश बोपचेने युनियन बँक ऑफ इंडियामध्ये संपर्क साधले. बँकेने सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रांची पूर्तता करत योगेश बोपचेच्या मृत्यू संदर्भात दोन लाख रुपयांच्या नुकसान भरपाईसाठी अर्ज सादर करण्याचे प्रयत्न सुरू केले.
मात्र माराठीतील पोलिस एफआयआर बँकेला मान्य नाही.
मात्र, गेले दोन आठवडे युनियन बँक ऑफ इंडियाचे अधिकारी त्या अर्जावर कार्यवाही करत नाहीत. योगेशच्या मृत्यू संदर्भातला नागपूरच्या बेलतरोडी पोलिस स्टेशनचा एफआयआर मराठी भाषेत आहे, फक्त या हास्यास्पद कारणापायी लोकेशचा अर्ज स्वीकारत नाहीत.
पोलिस एफआयआर मधील अपघाताचा तपशील मराठीत नमूद आहे, त्याचे इंग्रजी किंवा हिंदी भाषांतर करून तो नोटराईज्ड करा आणि प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपात ते सादर करा. तेव्हाच आम्ही तुमचा अर्ज स्वीकारू असं आडमुठे धोरण बँकेच्या अधिकाऱ्यांनी घेतलं आहे.
केवळ भाषेच्या कारणामुले गेली दोन आठवडे लोकेश त्याच्या भावाच्या मृत्यूनंतर मिळू शकणाऱ्या नुकसान भरपाई संदर्भातला अर्ज हातात घेऊन युनियन बँक ऑफ इंडियाच्या सेमिनरी हिल्स शाखा आणि बेलतरोडी पोलिस स्टेशन दरम्यान हेलपाटे घालत आहे.