शिवसेना मनसे युतीबाबत उद्धव आग्रही तर राजची सावध भूमिका
मुंबई/त्रिभाषा सूत्रावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे तब्बल २० वर्षांनी एकत्र झाले. ठाकरे बंधूंचा मेळावा ५ जुलै रोजी मुंबईतील एनएससीआय डोममध्ये साजरा करण्यात आला. एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या मेळाव्यात भूमिका मांडली. मात्र राज ठाकरेंनी युतीबाबत सावध भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर आता ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत काही प्रक्रियेला सुरुवात झाली आहे का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाली की, पाच तारखेला जो मराठी भाषेचा विजय उत्सव झाला, त्याची लोक अद्याप चर्चा करत आहेत. महाराष्ट्राची जनता या एका क्षणाची गेल्या वीस वर्षांपासून वाट पाहत होती आणि तो क्षण आल्यावर आता जनतेच्या अपेक्षा नक्कीच उंचावलेल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून एक भूमिका स्पष्ट व्हावी, अशी लोकांची अपेक्षा जरी असली तरी योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात. जसे भारतीय जनता पक्ष आणि मिंधे गटाचे लोक सांगत होते की, हे दोघे एकाच व्यासपीठावर येणे शक्यच नाही. आता ते म्हणत आहेत की, युती केली तर आम्ही पाहतो, हे आव्हान परप्रांतीयांकडून नाही. कसे येतात पाहतो म्हणजे तुम्ही ठाकरेंना कंट्रोल करत आहात का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
