मुंबई : राज आणि उद्धव भलेही एकत्र आले तरी त्यात राजच्या मनसेचे नुकसान आहे.त्यातच मी उद्धवला जवळून ओळखतो तो राजचा घातपात करण्याचीही शक्यता आहे असा अजब दावा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे.
महाराष्ट्रात शिवसेना-मनसे म्हणजेच ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा जोरदार सुरू असून ५ जुलै रोजी विजयाचा जल्लोष साजरा केला दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येत आहेत. शाळेतील इयत्ता पहिलीपासून हिंदी किंवा इतर भाषा सक्तीचा शासन आदेश मागे घेण्यात आल्यानंतर ठाकरे बंधूंकडून आवाहन करण्यात आलेला मोर्चा रद्द करण्यात आला. मात्र, ५ तारखेला मराठीच्या मुद्द्यावरुन विजयाचा जल्लोष केला. त्यामुळे, ठाकरे बंधूंच्या एकीची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे महायुतीमधील काही नेते किंवा बाळासाहेब ठाकरेंसमवेत शिवसेनेत काम केलेले वरिष्ठ नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत. खासदार नारायण राणे यांच्यानंतर आता राज-द्धव युतीवर माजी मंत्री व ज्येष्ठ नेते रामदास कदमांनी स्फोटक मुलाखत दिली. राज ठाकरेंना जीवे मारण्याचा कोणाचा डाव होता? असा थेट सवाल कदम यांनी विचारला आहे.
राज उद्धव ठाकरेंच्या संघर्षाची रामदास कदमांनी चिरफाड करण्याचा प्रयत्न आपल्या मुलाखतीमधून केला आहे. राज ठाकरेंना जीवे मारण्याचा डाव कुणाचा होता? असा सवाल उपस्थित करत कदमांनी एकप्रकारे गौप्यस्फोटच केला आहे. कणकवलीत राज ठाकरेंसोबत काय घडणार होतं ? राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्यानं हितं कसं होणार? राज-उद्धवच्या युतीत कुणाचा बळी जाईल? रामदास कदमांनी राज ठाकरेंच्या डोळ्यात कधी पाणी पाहिलं ? विजय सभा काढायला नेमका कोणाचा विजय झाला? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे कदम यांनी आपल्या मुलाखतीतून दिली आहेत.
उद्धव ठाकरेंना मी जवळून पाहिले आहे. राज ठाकरेंनी या आधीही एकत्रित येण्याचा प्रस्ताव दिला होता पण उद्धव ठाकरे म्हणाले होते एका म्यानात दोन तलवार राहणार नाही. दोन्ही भाऊ एकत्र येण्यानं मराठी माणसाचं काय हित आहे. याउलट जे मुंबईत राहिले आहेत ते सुद्धा मुंबई बाहेर फेकले जातील, अशा शब्दात रामदास कदम यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर परखडपणे भूमिका मांडली. उद्धव ठाकरेंनी मनसेचे ६ नगरसेवक फोडले, राज यांच्या मुलाला पाडलं तेव्हा मराठी माणसाचं हित कुठे गेलं होतं? राज यांचा मी चाहता, चांगले मित्र पण मराठी माणसाचं काय हित आहे ते राज यांनी सांगावं? असा सवालही कदम यांनी विचारला आहे.
पवारांना सोडणार का?
महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार यांना सोडणार का हे आधी स्पष्ट करा. उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन फिरत आहेत. महापालिका निवडणुकीनंतर वापरून ते मनसेला फेकून देतील. बिंदू माधव, जयदेव ठाकरे यांचा परिवार तरी उध्द्ववसोबत आहे का ते सांगावं?. उलट दोन भावांनी सर्व परप्रांतीयांना एकत्र केले. मुंबईत आज फक्त १० टक्के मराठी माणूस उरला आहे, तोही सर्व पक्षात विखुरलेला आहे. शासनानं जीआर मागे घेतला त्याचं अभिनंदन. पण आधीच्या अहवालावर सह्या का केल्या होत्या? वातावरण निर्मिती करून मराठी माणसांना शेंड्या लावण्याचं काम सुरू आहे. राज ठाकरेंसोबत घरी बसलेल्या पदाधिकाऱ्यांना पदावरून हटवले जायचे, त्यापैकी मी एक आहे, असेही कदम यांनी म्हटले.
राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन होता
राज ठाकरे यांच्या घातपाताचा उद्धव ठाकरे यांनी प्लॅन केला होता. कणकवलीला जातांना आम्हाला रास्ता बदलावा लागला. एसपीने मुंबईत परतण्यास सांगितले होते. हे सगळं राज ठाकरेंना विचारा? असा खळबळजनक दावा रामदास कदम यांनी केला आहे. राज यांनी आदित्यला निवडून दिले पण उद्धव यांनी हा पथ्य पाळले का ? उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं राज ठाकरेंना निमंत्रण दिलं पण व्यासपीठावर बसायला जागा दिली नव्हती. मी उठून बसायला जागा दिली होती. मग काय अपमान करायला बोलावलं होतं का?, असा सवालही रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू होते
मग एवढं सगळं असून महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र येण्याचं गौडबंगाल ते काय ? मी राज यांच्या डोळ्यात अश्रू पाहिले आहेत. मातोश्रीतून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते. उद्धव फक्त वापरून घेणारा माणूस. मला, दिवाकर रावते, लीलाधर ढाके यांच्यासारख्या लोकांना वापरून घेऊन सोडून दिले. आमची आमदारकी काढून घेतली, मंत्रिपद काढून घेतलं. त्यानंतर बाप आणि बेटा मंत्रिमंडळात स्वतः आले, असा दावाही कदम यांनी केला आहे. टक्केवारीसाठी मराठी माणसाला उध्वस्त केलं, महाबळेश्वरमध्ये उद्धव ऐवजी राज यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली असती तर मराठी माणसाला न्याय मिळाला असता, असे स्फोटक दावे रामदास कदम यांनी आपल्या मुलाखतीतून केले आहेत.

