बंगळुरू -बजरंग दलासारख्या राष्ट्रभक्त संघटनेवर बंदीची मागणी करणं म्हणजे एक प्रकारे देशद्रोह्यांनाच साथ देण्यासारखे आहे, असं वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. बेळगावात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत असताना त्यांना याविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिलं आहे
भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. यापूर्वीही लोकसभेच्या निवडणुकीत मी बेळगावात प्रचारासाठी आलो होतो. विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कर्नाटकात प्रभारी होते. तेदेखील सर्वत्र फिरले आहेत. मी स्वत: मराठी भाषिकांच्या मागे उभा आहे आणि आमचा पक्ष सुद्धा ठामपणे उभा आहे. संजय राऊतांनी काँग्रेसची दलाली करणे सोडले, तर मला कर्नाटकात जाण्याची गरज पडली नसती. संजय राऊत यांच्या गटाचा काँग्रेस हा मित्रपक्ष आहे. त्यांनी आपल्या मित्रपक्षाला प्रचार कुठे करा आणि कुठे करु नका, याबाबत सांगितले नाही. कारण, ते येथे काँग्रेसची दलाली करण्यासाठी आले होते, असेही फडणवीस म्हणाले.
बेळगावातील प्रचार सभांमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बेळगावात आणि कर्नाटकातही कमळच फुललेले दिसेल. गेल्या ९ वर्षांत देशात मोठे परिवर्तन झाले आहे. गरिबांसाठी दिल्लीतून जाणारा प्रत्येक पैसा पूर्णपणे गरिबांच्या खात्यात जात आहे. दलाली आणि मध्यस्थांची संपूर्ण यंत्रणा संपविण्याचे काम मोदीजींनी केले. भारताला जगातील पाचव्या क्रमाकांची अर्थव्यवस्था बनविण्याचे काम मोदीजींनी केले. मूठभर लोकांच्या तिजोरीत असलेला पैसा देशाच्या तिजोरीत आल्याबरोबर देशात झालेले परिवर्तन तुम्ही अनुभवत आहात असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.बजरंग दलावर बंदीची मागणी म्हणजे देशद्रोह आहे असेही त्यांनी म्हटले आहे
