फुटबॉल विश्वचषकाच्या यजमान शहरातून, मेक्सिको सिटीच्या भूमीतून मी हे लिहित आहे. ही केवळ एक नगरी नाही; ही फुटबॉलच्या इतिहासाची जिवंत साक्षीदार नगरी आहे. याच शहराने जगाला एक असा नायक दिला, ज्याला काळाच्या ओघात देवत्व प्राप्त झाले. १९८६ मध्ये याच ऐतिहासिक स्टेडियमवर दिएगो मॅराडोनाने अर्जेंटिनाला दुसरे विश्वविजेतेपद मिळवून दिले आणि स्वतःला फुटबॉलच्या अमर गाथेत कोरून ठेवले. त्या सुवर्णक्षणांच्या आठवणी अजूनही या शहराच्या हवेत तरंगताना जाणवतात.
आज, त्याच मेक्सिको सिटीत, त्या इतिहासाच्या सावलीत उभा राहून, पत्रकार म्हणून अधिकृत मान्यता घेऊन विश्वचषकाच्या प्रेस बॉक्समधून वार्तांकन करण्याची संधी मला लाभली आहे. हा केवळ माझा वैयक्तिक प्रवास नाही; हा मराठी पत्रकारितेच्या स्वप्नांचा, जिद्दीचा आणि अस्मितेचा प्रवास आहे.
जगातील २११ देशांमध्ये फुटबॉल खेळला जातो. अब्जावधी चाहत्यांच्या भावना ज्याच्याशी जोडलेल्या आहेत, अशा या महाकुंभासाठी अधिकृत मान्यता मिळवणे हे कोणत्याही पत्रकारासाठी अभिमानाचे असते. पण यावेळी अभिमानाची गोष्ट अशी की, महाराष्ट्रातील मराठी पत्रकारितेच्या इतिहासात प्रथमच विश्वचषकाचे अधिकृत अॅक्रिडिटेशन मिळाले आहे. आणि त्या इतिहासाचा पहिला साक्षीदार, पहिला प्रतिनिधी म्हणून मी येथे उभा आहे.
हा क्षण केवळ एका पत्रकाराचा नाही. हा प्रत्येक मराठी वाचकाचा आहे. हा त्या मातृभाषेचा आहे, जिच्या शब्दांमध्ये आपण जग पाहतो, स्वप्ने रंगवतो आणि भावना व्यक्त करतो. अनेक दशकांपासून इंग्रजी आणि इतर भाषांच्या माध्यमांनी गाजवलेल्या या जागतिक व्यासपीठावर आज मराठीचाही आवाज तितक्याच अभिमानाने घुमत आहे.
हे सारे लिहिण्याचे कारण म्हणजे अनेकांनी मला मेसेज पाठविले की माझा फोन लागत नाही. मी मेक्सिकोत असल्याने थोडीशी रेंजची अडचण आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीची धूम सुरू आहे आणि संघाचा अध्यक्ष असून मी मेक्सिकोत ऑन ड्युटी रिपोर्टिंग करतोय. हीच आपल्या पत्रकार संघाची खरी ओळख आहे.
निवडणुका मैत्रीपूर्ण भावनेने लढवल्या जातील, याची मला पूर्ण खात्री आहे. दरम्यान, संघाचे कोणतेही काम थांबणार नाही याची दक्षता माझे सहकारी कार्यवाह शैलेश शिर्के, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर आणि राजेंद्र हुंजे, तसेच खजिनदार जगदीश भोवड आणि संपूर्ण कार्यकारिणीने घेतली आहे
– संदीप चव्हाण
अध्यक्ष

