मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागाने मौलाना शौकत अली मार्गावरील जुने फर्निचर विक्रेत्यांवर तसेच इतर अतिक्रमणांवर कठोर कारवाई करून दाखवली. नुकताच सहायक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेले आनंद कंकाळ यांच्या नेतृत्वात ही ‘आल्या आल्या दणक्यात’ मोहीम राबवली गेली. उपायुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनात पार पडलेली ही कारवाई अतिक्रमणविरोधातील ठाम भूमिकेचे उदाहरण ठरली.
मौलाना शौकत अली मार्गावर, विशेषत: मुरली देवरा नेत्र रुग्णालयापासून ते जे. जे. रुग्णालय सिग्नलपर्यंतच्या परिसरात फर्निचर विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे पादचारी चुकून रस्त्यावर उतरत होते. यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. या धोकादायक स्थितीला तात्काळ उत्तर देत ‘ई’ विभागातील परिरक्षण आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाने मुंबई पोलिसांच्या सहकार्याने संयुक्त मोहीम राबवली.
कारवाईदरम्यान फर्निचर विक्रेत्यांवर थेट धडक बसली! पदपथांवर अस्ताव्यस्त पसरलेले जुने फर्निचर जेसीबीच्या मदतीने जागेवरच तोडून नष्ट करण्यात आले. तोडलेल्या मालाचा कचरा तात्काळ हटवला गेला. सर्व अतिक्रमणे काढून टाकली असून, अनधिकृत फेरीवाल्यांवरही निष्कासनाची कारवाई झाली. परिणामी, रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी मुक्त झाला.
या मोहिमेत १ जेसीबी, ४ मजूर, ३ अधिकारी, २ अभियंते आणि नागपाडा पोलीस ठाण्यातील ९ अंमलदार सहभागी होते. दरम्यान, अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांविरुद्ध ‘ई’ विभागाकडून नियमित कारवाई चालूच राहील, असा इशारा देण्यात आला आहे.

