मुंबई/मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढवणाऱ्या माफियांविरोधात महापालिका सभागृहात प्रचंड गरमागरमी झाली. उबाठाच्या नगरसेवकाने फेरीवाला माफियाच्या विरोधात उपस्थित केलेल्या हरकतीच्य मुद्दयाला भाजपनेही पाठिंबा देत फेरीवाल्यांचे माफिया राज कायमच उखडून टाका अशी मागणी सभागृहात केली. रोटी,कपडा मकानचा अधिकार देतानाच शहराचा बेरंग होत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. रोटी कपडा मकानची काळजी घेणाऱ्यांनी घ्यावी आम्हाला मुंबईची काळजी असल्याचे सांगत फेरीवाल्यांच्या माफियांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान महापौरांनी यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगत हा महापौरांनी हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.
मुंबईतील महापालिका सभागृहात उबाठाचे नगरसेवक शैलेश फणसे यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे फेरीवाल्यांमधील माफियाराजवर चिंता व्यक्त करत प्रशासनाच्यावतीने कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याची नाराजी व्यक्त केली. महापालिका आयुक्तांनी मुंबईतील काही भाग फेरीवाला मुक्त करण्याची घोषणा केली असे सांगत फणसे यांनी मुंबईत जसे भूमाफिया असतात तसेच आता फेरीवाला माफिया तयार आहेत. वर्सोवा येथील दादाभाई नौरोजी उद्यानाला फेरीवाल्यांनी विळखा घातला आहे.नागरिकांना उद्यात शिरता येत नाही. आणि या फेरीवाल्यांचे माफिया आता ऑफिस टाकून बसले आहेत. त्यांना तीन ते चार नोटीस देवूनही त्यांच्या कार्यालयावर कारवाई झालेली नाही. त्यांचे रॅकेट एवढे आहेत, त्यांच्या फेरीवाल्यांचे सामान आणि हातगाडी तात्काळ सोडली जाते. त्यामुळे महापालिका कारवाई करत असताना या माफियांवर कधी कारवाई करणार असा सवाल त्यांनी केला. यावर काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी माफियांवर न बोलता फेरीवाल्यांवरील कारवाईमुुळे त्यांचे संसार चालणार नसल्याबाबत चिंता व्यक्त केली.

