आयुष्यात मित्र खूप भेटतात. काही चहाच्या कपाबरोबर संपतात. काही व्हॉट्सॲपच्या ‘गुड मॉर्निंग’पुरते उरतात. काही निवडणूक आली की जवळ येतात आणि निकाल लागला की मोबाईलच्या नेटवर्कसारखे गायब होतात. पण काही मित्र असे असतात, ज्यांच्यासाठी ‘मित्र’ हा शब्दच जरा छोटा पडतो. माझ्यासाठी संदीप चव्हाण तस्साच आहे.
माझा परममित्र. माझा जिवलग. माझा यारों का यार!
या माणसाच्या जिभेवर साखर आहे आणि चेहऱ्यावर हास्य. त्यामुळे तो समोरच्याला पटवतो की संमोहित करतो, हे आजपर्यंत मलाही कळलेलं नाही. भल्याभल्यांनी त्याच्यासमोर आपली तलवार म्यान केलीय. कारण संदीपशी भांडायला आलेला माणूसही दहा मिनिटांनी त्याच्यासोबत चहा पिताना दिसतो. हा गुण शिकवता येत नाही. तो देवाने जन्मताना कपाळावर लिहून पाठवावा लागतो.
त्याच्या आयुष्यात संकटांची वेबसिरीज आली. एक संपलं की दुसरं दारात. दुसरं गेलं की तिसरं अंगणात. संकटांनी जणू त्याच्या घराचा पत्ता पाठ केला होता. पण हा पठ्ठ्या जराही डगमगला नाही. प्रत्येक संकटाला हसून सामोरा गेला. संकट दारात आलं की संदीप त्याला म्हणाला असावा, बस… आधी चहा घे! आणि मग संकटानेच विचार केला असावा की या माणसाशी पंगा घेण्यापेक्षा दुसरा पत्ता शोधलेला बरा!
मित्रांसाठी जगणं म्हणजे काय, हे मला संदीपकडे पाहून कळलं. स्वतःच्या खिशात पैसे नसतील, पण मित्र अडचणीत असेल तर हा दुसऱ्याकडून कर्ज काढेल आणि मित्राच्या हातात पैसे ठेवेल. स्वतःची चिंता उद्यावर ढकलेल, पण मित्राची अडचण आज सोडवेल. अशा माणसाला श्रीमंत म्हणण्यासाठी त्याचा बँक बॅलन्स पाहावा लागत नाही.
त्याचं मनच त्याची सर्वात मोठी मुदत ठेव आहे.
मित्राच्या फक्त आर्थिक अडचणीत नाही, तर त्याच्या वैयक्तिक आयुष्याच्या अंधाऱ्या कोपऱ्यातही संदीप दिवा घेऊन उभा राहतो. कुणाचा संसार डळमळत असेल, कुणाचं मन तुटलेलं असेल, कुणी निराशेच्या कड्यावर उभा असेल, तर हा माणूस भाषण देत नाही. फक्त खांद्यावर हात ठेवतो. आयुष्याच्या काही वळणांवर खांद्यावरचा एक हात हजार शब्दांपेक्षा मोठा असतो. संदीपचा तो हात अनेकांच्या आयुष्यात आला आहे. म्हणूनच त्याच्या मित्रांची यादी मोबाईलच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये मावत नाही, ती माणसांच्या मनात साठलेली आहे.
संदीपचं एक तत्त्व मला कायम आवडत आलंय की एकवेळ मित्र कमी असले तरी चालतील, पण शत्रू नकोत. म्हणून हा माणूस पूल बांधतो, भिंती नाही. ज्याने त्याला दुखावलं, त्याच्याशीही वेळ आल्यावर माणुसकीने वागतो. आजच्या काळात हा गुण दुर्मिळ आहे. कारण आपण आता माणसं जोडण्यापेक्षा ‘ब्लॉक’ करण्यात पटाईत झालोय.
क्रीडा पत्रकार म्हणून संदीप हा वेगळाच प्राणी आहे. त्याची लेखणी अनेकदा तलवार झाली, पण ती कुणाचा गळा कापण्यासाठी नाही, अन्यायाची दोरी कापण्यासाठी. खेळाडूंना न्याय मिळावा म्हणून त्याने भल्याभल्यांना अंगावर घेतलं. मैदानावर घाम गाळणाऱ्या खेळाडूच्या डोळ्यातलं पाणी त्याला वातानुकूलित कार्यालयात बसलेल्या पदाधिकाऱ्याच्या अश्रूंपेक्षा नेहमी मोठं वाटलं. म्हणून माझ्यासाठी संदीप फक्त क्रीडा पत्रकार नाही.
तो क्रीडा पत्रकारितेचं चालतं-बोलतं आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आहे!
अर्थात, प्रत्येक विद्यापीठात एखादा विषय कठीण असतोच. संदीपच्या विद्यापीठात दोन विषय फारच कठीण आहेत. पहिला, स्वतःचं मार्केटिंग! ते त्याला भारी आवडतं आणि जमतं सुद्धा. त्याच्या मार्केटिंगच्या जाळ्यात अनेक जण अडकतातही. कधी कधी मला वाटतं, संदीपने पत्रकारिता केली नसती तर एखाद्या साबणाची जाहिरात करून तो साबण चंद्रावरही विकला असता!
आणि दुसरा विषय, वेळ!
दुसऱ्याच्या वेळेची किंमत या माणसाला कधी कळेल, यासाठी स्वतंत्र आयोग नेमावा लागेल. एखाद्याला पाच मिनिटांत येतो, म्हणेल आणि त्या पाच मिनिटांत पृथ्वी सूर्याभोवती अर्धी प्रदक्षिणा घालून येईल! तुम्ही वाट पाहत बसाल. चहा थंड होईल. पुन्हा गरम होईल. तुमच्या डोक्यावरचे दोन केस पांढरे होतील आणि मग संदीपचं आगमन होईल.
चेहऱ्यावर तेच मोहक हास्य.
कधी कधी ते नकली वाटेलही! पण तुम्ही त्याला शिवी द्यायचं विसराल. हा त्याचा सर्वात धोकादायक गुण आहे. उशीर त्याचा आणि अपराधी तुम्ही व्हाल.
आपल्या नेतृत्वगुणांनी त्याने मुंबई मराठी पत्रकार संघाची बाग फुलवली. अध्यक्षपद त्याच्यासाठी खुर्ची नव्हती; ती जबाबदारी होती. आज तो सलग दुसऱ्यांदा मुंबई मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष झाला आहे. हे सहज घडत नाही. खुर्ची एकदा मिळू शकते, पण माणसांचा विश्वास दुसऱ्यांदा मिळवावा लागतो. आणि तो त्याने मिळवला आहे.
पत्रकार संघाला वेगळ्या उंचीवर नेण्याचं त्याचं स्वप्न आहे. त्यासाठी तो वायुवेगाने, न थकता काम करतोय. पण मित्रा, एक प्रेमाचा सल्ला, थोडं काम इतरांनाही करू दे! सगळी दुनिया स्वतःच्या खांद्यावर घेण्याची सवय चांगली असली, तरी कधीतरी खांदेही थकतात आणि तुझे खांदे फक्त जबाबदाऱ्या वाहण्यासाठी नाहीत, मित्रांनी प्रेमाने हात ठेवण्यासाठीही आहेत.
तुझ्या आयुष्याचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखा आहे. क्रीडा पत्रकार. निर्भीड लेखणी. खेळाडूंचा आवाज. मग चॅनेल आणि वर्तमानपत्राच्या मालकापर्यंतचा साहसी प्रवास. प्रत्येक पायरीवर संकटं. प्रत्येक वळणावर परीक्षा. पण हा पठ्ठ्या वादळाला घाबरला नाही. त्याने वादळालाच जहाज बनवलं आणि यशाचा किनारा गाठला.
संदीप साईभक्त आहे. पण मला अनेकदा वाटतं, साईबाबाही वरून त्याच्याकडे पाहून म्हणत असतील, अरे, आणखी माझे किती भक्त वाढवशील? कारण स्वतःच्या आनंदात मित्रांना विसरणं त्याच्या स्वभावात नाही. आनंदाचा क्षण आला की तो एकट्याने साजरा करत नाही. मित्रांना गोळा करतो आणि शिर्डीची वारी घडवतो. देवाकडेही हा एकटा जात नाही, आपली माणसं सोबत घेऊन जातो. कदाचित म्हणूनच देवही त्याच्या पाठीशी उभा राहत असावा.
आणि हो… माझ्या या मित्राचं एक स्वप्न आहे.
छोटंसं नाही.
नगरसेवक होण्याचं नाही.
आमदार होण्याचं नाही.
खासदार होण्याचंही नाही.
या पठ्ठ्याला थेट हिंदुस्थानचा राष्ट्रपती व्हायचं आहे. दुसरा कोणी असता तर मी हसलो असतो. पण संदीपबाबत मी हसत नाही. कारण मी त्याला शून्यातून उभं राहताना पाहिलंय. संकटांच्या डोळ्यात डोळे घालताना पाहिलंय. पडताना पाहिलंय. पुन्हा उठताना पाहिलंय. स्वतःच्या जखमा लपवून दुसऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसताना पाहिलंय. स्वतःच्या आयुष्यात वादळ असतानाही मित्राच्या घरात दिवा लावताना पाहिलंय.
म्हणून त्याचं राष्ट्रपती होण्याचं स्वप्न मला विनोद वाटत नाही. स्वप्न मोठं असलं की आकाशही थोडं खाली झुकतं.
आज तो सलग दुसऱ्यांदा मुंबई मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष झाला आहे. उद्या कुठे पोहोचेल, कोण जाणे? कदाचित एखाद्या दिवशी राष्ट्रपती भवनाच्या पायऱ्यांवर उभा राहून तो तेच मोहक हास्य करेल. आणि मी खाली उभा राहून ओरडेन, अरे लाडक्या, राष्ट्रपती झालास… पण वेळेवर आलास का?
तो हसेल. मी हसेन. पण कदाचित माझे डोळे भरून आलेले असतील.
कारण काही मित्रांच्या यशात आपला हिस्सा नसतो…
आपलं हृदय असतं.
संदीप, तुझ्या वाढदिवशी तुला काय देऊ? तुझ्याकडे मित्रांची श्रीमंती आहे. माणसांचं प्रेम आहे. संघर्षाची ताकद आहे. नेतृत्वाची उंची आहे. लेखणीची धार आहे आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची हिंमत आहे.
फक्त एकच मागणं साईचरणी करीन, तुझ्या चेहऱ्यावरचं हे हास्य कधी मावळू नये. तुझ्या मनाची श्रीमंती कधी कमी होऊ नये. तुझ्या मदतीचा हात कधी थकू नये. तुझ्या स्वप्नांचे पंख कधी छाटले जाऊ नयेत. तुला दणदणीत यश लाभो. ठणठणीत आरोग्य लाभो. आणि तुझ्या राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचण्याच्या स्वप्नालाही साईबाबांनी बळ द्यावं. कारण मित्रा, तू मोठा झालास तर माझ्यासारख्या तुझ्या असंख्य मित्र-मैत्रिणींसाठी तो फक्त आनंदाचा क्षण नसेल, तो अभिमानाचा क्षण असेल. तुझ्या यशाच्या टाळ्यांमध्ये आमचे हात असतील. तुझ्या विजयाच्या गर्दीत आमचे चेहरे असतील. आणि तुझ्या डोळ्यांत आनंदाश्रू आले, तर कदाचित दूर कुठेतरी आमचेही डोळे ओले झालेले असतील.
आयुष्याच्या या प्रवासात पदं बदलतील. खुर्च्या बदलतील. माणसं बदलतील. काळ बदलेल. कदाचित तुझ्या नावापुढची विशेषणंही बदलतील. आज ‘अध्यक्ष’ आहेस. उद्या आणखी मोठं पद असेल. परवा कदाचित खरंच राष्ट्रपती भवन असेल.
पण माझ्यासाठी?
तू कायम तोच राहशील.
अडचणीत धावून येणारा दोस्त. संकटावर हसणारा जाँबाज. मित्रासाठी कर्ज काढणारा वेडा. खेळाडूसाठी लेखणी उगारणारा पत्रकार. लोकांना जोडणारा नेता. साईच्या चरणी नतमस्तक होणारा भक्त.
आणि माझ्या आयुष्यातला एक अतिशय मौल्यवान माणूस.
मित्रा, आयुष्याने मला खूप माणसं दिली. काही निघून गेली. काही बदलली. काही गर्दीत हरवली. पण तुझ्यासारखा मित्र दिल्याबद्दल मी नियतीचा ऋणी आहे.
कधीतरी आपण म्हातारे होऊ. तुझ्या पाच मिनिटांत येतो ची वाट पाहताना माझे उरलेसुरले केसही पांढरे होतील. आपल्या हातात पत्रकारितेची लेखणी नसेल. पदं नसतील. निवडणुका नसतील. सभागृहातील टाळ्या नसतील. कदाचित आजची धावपळही नसेल.
पण एखाद्या संध्याकाळी आपण दोघे चहाचा कप घेऊन बसलेलो असू.
मी तुला पुन्हा चिडवेन, संदीप, आयुष्यभर सगळ्यांना वेळ दिलास… फक्त वेळेवर कधी आलास नाहीस!
तू नेहमीसारखा हसशील आणि त्या क्षणी मला पुन्हा जाणवेल की
पदांपेक्षा मोठी मैत्री असते.
यशापेक्षा मोठी माणुसकी असते. आयुष्यातल्या हजारो ओळखींपेक्षा एक जिवलग मित्र मोठा असतो.
माझ्यासाठी तो मित्र तू आहेस.
माझा परममित्र.
माझा जिवलग.
माझा यारों का यार…
संदीप चव्हाण!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा, लाडक्या!
तुझा भांडखोर मित्र,
मंग्या

