मी, मुंबई मराठी पत्रकार संघ.
आज माझा ८५ वा वाढदिवस म्हणजेच वर्धापन दिन.
वाढदिवस म्हटलं की लोकं केक कापतात. माझ्या बाबतीत मात्र लोकं विश्लेषणं कापतायत.
कोणी म्हणतं, हा ८५ वर्षांचा म्हातारा झालाय.
कोणी म्हणतं, अहो, हा अजूनही तरुण आहे.
कोणी माझ्या खांद्यावर हात ठेवून सांगतं, मराठी पत्रकारितेची संस्कृती जपणारं हे शेवटचं केंद्रस्थान.
तर काही जण मला अडगळीत पडलेल्या जुन्या टायपरायटरसारखं समजू लागलेत. ज्याचा इतिहास मोठा, पण वर्तमान धुळीने झाकलेलं.
खरं कोण? खोटं कोण?
पत्रकारांच्या दुनियेत राहून ८५ वर्षांत मी एक गोष्ट शिकलोय. एकाच घटनेचे पाच पत्रकार पाच अर्थ काढू शकतात. त्यामुळे माझ्याबद्दलची मतंही वेगवेगळी असणं साहजिकच आहे, पण सध्या मला जास्त काळजी कशाची वाटते माहिती आहे?
माझ्या निवडणुकीची!
मला सांभाळण्यासाठी, माझं वैभव वाढवण्यासाठी निवडणूक होतेय. ही आनंदाची बाब आहे. पण मला सांभाळण्याची इच्छा असलेलेच एकमेकांवर अशी चिखलफेक करताहेत की कधी कधी वाटतं, माझं संरक्षण करण्यासाठी आलेत की माझ्या भिंतीच रंगवून टाकणार आहेत?
माझ्या नावाने लढताना माझीच प्रतिष्ठा धुळीत मिसळली जाऊ नये, एवढीच अपेक्षा आहे.
अहो, ही लोकसभा नाही.
ही विधानसभा नाही.
ही महानगरपालिका नाही.
इथे सत्ता मिळवून मंत्रालय मिळणार नाही.
इथे लाल दिव्याची गाडी मिळणार नाही.
इथे मिळणार असेल तर फक्त जबाबदारी आणि जबाबदारीचे ओझे उचलण्याची तयारी.
माझ्यासाठी सध्या आश्वासनांचा असा पाऊस पडतोय की हवामान खात्यालाही लाज वाटावी. प्रत्येक जण मला स्वर्गात नेण्याच्या गप्पा मारतोय. पण मला स्वर्ग नकोय. मला जमिनीवर उभं राहायचंय. सदस्यांमध्ये जगायचंय.
आता थोडंसं तुमच्याशीही बोलतो.
माझ्या प्रिय सदस्यांनो,
निवडणुकीच्या दिवशी सोशल मीडियावर पोस्ट टाकणं सोपं आहे. व्हॉट्सअॅपवर प्रतिक्रिया देणं सोपं आहे. पण वर्षातून एकदा होणाऱ्या माझ्या सर्वसाधारण सभेला यायला तुमच्याजवळ वेळ नसतो? पाच टक्के सदस्यही सभेला उपस्थित राहत नाहीत, हे पाहून मला कधी कधी वाटतं, माझी काळजी जास्त कोण घेतं ? माझे सदस्य की माझ्या या इमारतीतले कबूतर?
पत्रकार म्हणून तुम्ही समाजाला प्रश्न विचारता, पण स्वतःच्या संघटनेबाबत स्वतःलाच कधी प्रश्न विचारला आहे का?
माझ्याकडे काय कमी आहे, यापेक्षा मी काय देऊ शकतो, हा विचार किती जण करतात?
काळ बदलतोय.
पत्रकारिताही बदलतेय.
टायपरायटरपासून एआयपर्यंतचा प्रवास मी पाहिलाय. शिसपेन्सिलपासून स्मार्टफोनपर्यंतची पिढी मी अनुभवलीय. आज अनेकांना माझा विसर पडू लागलाय. तर काही जण अजूनही माझी ओळख जिवंत ठेवण्यासाठी धडपडत आहेत. या बदलाच्या वादळात मला अशा लोकांची गरज आहे जे माझ्यावर प्रेम करतात. माझ्यासाठी वेळ देतात. माझी काळजी करतात.
म्हणून मतदान करताना उमेदवार कोणत्या मोठ्या पदावर आहे, कोणत्या मोठ्या वृत्तपत्रात काम करतो, त्याच्या नावापुढे किती विशेषणं लागली आहेत, यापेक्षा एकच प्रश्न स्वतःला विचारा,
हा माणूस माझ्या संघासाठी वेळ देईल का?
हा माणूस आत्मीयतेने काम करेल का?
हा माणूस निवडून आल्यानंतरही दिसेल का?”
जर या तीन प्रश्नांची उत्तरं “हो” असतील, तर त्यालाच मत द्या. कारण माझं भविष्य मोठ्या नावांवर नाही… तर मोठं काम करणाऱ्या माणसांवर उभं आहे.
आज मी ८५ वर्षांचा झालोय. पण अजून थकलो नाही. माझ्या शिरांमधून अजूनही मराठी पत्रकारितेचंच रक्त वाहतंय.
फक्त माझ्या या प्रवासात तुम्ही सोबत राहा.
माझं वैभव जपा.
माझी संस्कृती जपा.
आणि सर्वांत महत्त्वाचं…
मला निवडणुकीपुरतं आठवू नका; वर्षभर जिवंत ठेवा.

