मुंबई- प्रसिद्ध बॉलीवूड निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घराबाहेर गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घराबाहेर चार राउंड फायरिंग करण्यात आली. या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचले. संबंधित घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यांच्या घराबाहेर सुरक्षाही वाढवण्यात आली आहे, दिग्दर्शकाच्या घराबाहेर मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या घटनेने पुन्हा एकदा सेलिब्रिटींच्या सुरक्षिततेकडे लक्ष वेधले आहे.
रोहित शेट्टीच्या जवळच्या मित्राने सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने घराबाहेर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळून गेला. गोळीबार का झाला हे अद्याप समजलेले नाही. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. घरातले सर्व सदस्य सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.मुंबई पोलिसांनी सांगितले की, चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी चार राउंड पिस्तुलाने फायरिंग केली. त्यानंतर, जुहू येथील रोहित शेट्टीच्या घराभोवती मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जात आहे आणि हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी प्रत्येक संभाव्य दृष्टीने तपास केला जात आहे. या हल्ल्यामागील हेतू अद्याप समजू शकलेला नाही.

