ठाणे/ यंदा २९ महानगर पालिकांच्या निवडणुकीत ओवेसींच्या एम आय एम ने जबरदस्त कामगिरी केली आहे.याच जोरावर आता एमआयएम सत्ताधारी भाजपासह सर्वच पक्षांना इशारे देत आहे.मुंब्रा हा जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला पण इथल्या वॉर्ड क्रमांक ३० मधून एम आय एमच्या उमेदवार सहार शेख निवडून आल्या.त्यानंतर आपल्या विजयी मेळाव्यात बोलताना त्यांनी आम्हाला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचा आहे असा खळबळजनक एल्गार केल्याने सर्वच पक्षातील नेते मंडळी संतप्त झाली आहे.तसेच हे मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना उघड उघड आव्हान असल्याचे बोलले जात आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधून असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाची सहार शेख ही तरुणी निवडून आली आहे. सहार शेख हिचे वडील युनूस शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. काही वर्षांपूर्वी जितेंद्र आव्हाड मुंब्रा येथे प्रचाराला गेले असताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या युनुस शेख यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यंदाच्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत युनुस शेख यांनी आपल्या मुलीसाठी शरद पवार गटाकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, राष्ट्रवादीने उमेदवारी न दिल्यामुळे सहर शेख ही एमआयएमकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. ही निवडणूक जिंकल्यानंतर विजयी सभेत युनुस शेख आणि सहर शेख या बाप-लेकीने जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली.

