कबूल/पाकिस्तानने रविवारी पहाटे अफगाणिस्तानाच्या सीमेवर हवाई हल्ले केले आहेत. पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पाकिस्तान सरकारने दिली आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील केलेल्या या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानमधील लहान मुलांसह १९ नागरिकांचा बळी गेला असल्याची माहिती दिली गेली आहे. अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी त्यांच्या अधिकृत पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. पाकिस्तानने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी या हल्ल्यात ७ दहशतवादी तळांना लक्ष्य केलं आहे. इस्लामबादमध्ये इमाम बारगाह, बाजौर आणि बन्नू येथे काही दिवसांपूर्वीच आत्मघाती हल्ले झाले होते. या हल्ल्यात 11 पाकिस्तानी जवान आणि एका मुलाचा मृत्यू झाला होता. शिवाय पाकिस्तानच्या हल्ल्याच्या काही तासांपूर्वीच आणखी एक आत्मघाती हल्ला झाला होता. यामध्ये बन्नू जिल्ह्यातील सुरक्षा ताफ्याला लक्ष्य केले असून लेफ्टनंट कर्नलसह दोन जवानांचा मृत्यू झाला. पाकिस्तानने म्हटले आहे की या हल्ल्याचे सूत्रधार अफगाणिस्तानमध्ये असल्याचे त्यांच्याकडे पुरावे आहेत. त्यामुळे या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून त्यांनी रविवारी सकाळी ‘तहरीक-ए-तालिबान’, ‘इस्लामिक स्टेट-खोरासान’ सह ७ तळांवर हल्ले केले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे

