भोपाळ/बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाने नुकतंच मध्य प्रदेशातील उज्जैन येथील श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराला भेट दिली. यालेळी अभिनेत्रीने पवित्र भस्म आरतीमध्ये भाग घेतला. मंदिराच्या पुजाऱ्यांनी तिला शाल देऊन सन्मान केला. नवीन वर्षाच्या निमित्ताने आशीर्वाद घेण्यासाठी नुसरत मंदिरात पोहोचली होती. यावेळी मुस्लिम धर्म आणि धार्मिक सहिष्णुतेमुळे ती चर्चेचा विषय झाली होती. काहींनी हिंदू मंदिराला भेट देण्याच्या तिच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसंच एका मुस्लिम नेत्याने तिची कृती गंभीर पाप आहे सांगत टीका केली आहे. अखिल भारतीय मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी म्हटलं आहे की, शरिया कायद्यानुसार पूजा करणं आणि चंदनाचा टिळा लावणे ही कृत्ये ‘गंभीर पाप’ आहेत. अशा कृती इस्लामच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहेत, असा दावा त्यांनी केला. अभिनेत्रीने पश्चात्ताप करून कलमा पठण केले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहेनुसरत भरुचाने तिच्या श्रद्धाविषयक उदारमतवादी विचारांबद्दल नेहमीच खुलेपणाने भाष्य केलं आहे. शुभांकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत, तिने सांगितलं होतं की; मंदिर, मशीद किंवा चर्च असो, तिला विविध प्रार्थनास्थळांमध्ये शांती मिळते “माझ्यासाठी, माझी श्रद्धा खरी आहे. अविश्वसनीय गोष्टी घडतात आणि त्यामुळेच माझा विश्वास अधिक दृढ होतो. म्हणूनच मी अजूनही जोडलेली आहे, अजूनही खंबीर आहे आणि मला माहित आहे की मला याच मार्गावर चालायचे आहे,” असं ती म्हणाली

