मुंबई/माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात बुधवारी नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. त्यानंतर आज नाशिक पोलिसांचे एक पथक मुंबईत येण्याची शक्यता आहे. न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात काढलेल्या अटक वॉरंटची प्रत काल नाशिक पोलिसांना प्राप्त झाली होती. यानंतरची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नाशिक पोलीस आज पुढील कारवाई करणार आहेत. माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणाची सुनावणी उद्या होणार आहे. परंतु, त्यापूर्वीच पोलीस माणिकराव कोकाटे यांना अटक करतात का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. माणिकराव कोकाटे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना काल मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते रुग्णालयात असल्याने पोलीस त्यांच्यावर अटकेची कारवाई करु शकतात का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेया सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. माणिकराव कोकाटे यांना शुक्रवारी कोर्टाकडून दिलासा नाही मिळाला तर त्याच दिवशी राजीनामा मंजूर करण्याची भूमिका अजित पवार यांनी मांडली. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोकाटे यांच्या राजीनामावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या या बैठकीत अन्य मुद्द्यांवरही चर्चा झाली.
मुंबईत नवाब मलिक यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवावे की अन्य एक समिती गठित करून महायुतीसोबत जागावाटप चर्चा करावी यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. तसेच इतर एमएमआर भागात शक्य आहे तिथे भाजपसोबत लढण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी आहे. पुणे, पिंपरी, अमरावती महापालिकेत मात्र भाजपा विरोधात लढण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे

