मुंबई/राज्यात एकीकडे शाळांमध्ये हिंदीच्या सक्तीवरुन सातत्याने वाद निर्माण होत असताना दुसरीकडे मराठी शाळा मात्र बंद पडत असल्याचं चित्र आहे. मुंबईतील मराठी शाळा या ठरवून बंद पाडल्या जात असून त्या वाचवण्यासाठी येत्या १४ डिसेंबर रोजी परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. मराठी अभ्यास केंद्राकडून या परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून त्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आलं आहे.
मराठी अभ्यास केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना या परिषदेचं निमंत्रण दिलं. मुंबईतील शिवाजी मंदिर येथे 14 डिसेंबर रोजी मराठी शाळांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी मुंबईतील मराठी शाळांतील विद्यार्थी, पालक प्रतिनिधींनी उपस्थित राहावं असं मराठी अभ्यास केंद्राकडून आवाहन करण्यात आलं आहे.
या संबंधी बोलताना आनंद भंडारे म्हणाले की, “मुंबईतील अनेक मराठी शाळा बंद पडल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. मुंबई महानगरपालिकेकडून ठरवून या शाळा बंद पाडण्याचा कारभार केला जात आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी आम्ही राज ठाकरे यांना त्यांच्या जाहीरनाम्यात मराठी शाळांचा मुद्दा घ्या अशी विनंती केली. ती विनंती राज ठाकरे यांनी मान्य केली.”
मुंबईतील एका इमारतीत पार्किंग लॉटमध्ये मराठी शाळा दिली. मग कोण पालक आपल्या मुलांना अशा शाळेत पाठवणार? आज मुंबईत मराठी शाळा ठरवून बंद पाडल्या तर भविष्यात राज्यभरातील सर्व मराठी शाळा बंद पडतील. गेल्या दोन वर्षात २८ पैकी १७ मराठी शाळा बंद पडल्या आहेत. मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा टिकेल. त्यामुळे येत्या १४ डिसेंबर रोजी यावर परिषद घेणार आहोत असं आनंद भंडारे यांनी सांगितलं.

