पणजी/गोवा येथील अरपोरा नाइटक्लबमध्ये भीषण आग लागून तब्बल २५जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नाईट पार्टीदरम्यान सुरू असलेली मौजमजा काही क्षणांतच आगीच्या तांडवात बदलली. या प्रकरणी क्लबच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यासह मॅनेजर व इतर तिघांना अटक करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये क्लबचे मालक सौरभ लूथरा आणि गौरव लूथरा, तसेच कार्यक्रम आयोजक आणि मॅनेजर यांची नावे आहेत
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उच्चस्तरीय बैठक घेत नुकसानग्रस्त कुटुंबांसाठी मदत जाहीर केली. त्यामध्ये मृतांच्या नातेवाइकांना ५ लाख रुपये तर जखमींना २५हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांना दोन लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.सुरक्षा नियमांचे उल्लंघन करूनही क्लबला परवानगी देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. मृतांमध्ये ४ पर्यटक, १४कर्मचारी आणि इतर ७ जणांचा समावेश आहे. अरपोरा-नागोआचे सरपंच रोशन रेडकर यांनाही व्यापार परवान्यासंबंधी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

