बंगळुरु: कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यामध्ये आरपारची लढाई सुरु झाली आहे. दोन बलाढ्य नेत्यांमध्ये संघर्ष पेटल्यानं कर्नाटकात काँग्रेस समोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. शिवकुमार आणि सिद्धरामय्या मागे हटण्यास तयार नाहीत. त्यामुळे आता हा विषय दिल्लीत हायकमांडसमोर जाणार आहे. तिथेच या प्रश्नाचा निकाल लागेल.
दोननेत्यांमध्ये थेट संघर्ष निर्माण झाल्यानं राज्यातील काँग्रेस दुभंगली आहे. शिवकुमार समर्थक आमदार आणि नेते मुख्यमंत्री बदलावा या मागणीसाठी आग्रही आहेत. तर मुख्यमंत्रिपदी असलेल्या सिद्धरामय्या यांनीदेखील लॉबिंगला वेग दिला आहे. आपली खुर्ची वाचवण्यासाठी ते दिल्लीला जाऊन काँग्रेस हायकमांडची भेट घेतील.देशात तीन राज्यांमध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत आहे. कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणात काँग्रेस सत्तेत आहे. कर्नाटक हा काँग्रेसचा सर्वात मजबूत किल्ला आहे. पण दोन नेत्यांमधील संघर्षामुळे राज्यात राजकीय कुरघोड्या सुरु आहेत. मुख्यमंत्रिपदावरुन दोन नेत्यांमध्ये स्पर्धा सुरु असल्याचा परिणाम पक्षाच्या प्रतिमेवर झाला आहे. डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या दोन्ही नेते जाहीरपणे एकमेकांविरोधात विधानं करत आहेत. काँग्रेसचे आमदार, नेते दोन गटात विभागले आहेत. त्यामुळे काँग्रेसचा मजबूत किल्ला ढासळण्याची लक्षणं दिसू लागली आहेत.
कर्नाटक काँग्रेसमध्ये सत्ता संघर्ष रंगलेला असताना भाजप नं वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. हा काँग्रेसचा अंतर्गत वाद असल्याचं भाजप नेते सांगत आहेत. भाजपला डी. के. शिवकुमार यांची गरज नाही. काँग्रेसकडे हिंमत असेल तर त्यांनी विधानसभा बरखास्त करावी आणि राज्यात निवडणूक घेऊन दाखवावी, असं खुलं आव्हान कर्नाटक भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री व्ही. सोमन्ना यांनी दिलं आहे.सिद्धरामय्या विरुद्ध शिवकुमार वादापासून चार हात लांब राबण्याची योजना भाजपनं आखली आहे. काँग्रेसचे दोन्ही नेते मुरब्बी आहेत, याची कल्पना भाजपला आहे. हा संघर्ष जितका टोकाला जाईल, तितकं वातावरण काँग्रेसच्या विरोधात जाणार याची पूर्ण कल्पना भाजपला आहे. कर्नाटकातील जनता दर पाच वर्षांनी राज्यात सत्तांतर करते, याचीही जाणीव भाजपला आहे.

