मुंबई/शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावरून मुंबई उच्च न्यायालयाकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठीच्या प्रभावी उपायांची तसेच पालिकेने आणि राज्य सरकारने केल्या उपाययोजनांची उच्च न्यायालयाने माहिती मागितली आहे. आता या प्रकरणी शुक्रवारी तातडीने सुनावणी घेण्यात येणार आहे.
मुंबई आणि आसपासच्या परिसराची खालावलेली हवेची गुणवत्ता ही इथिओपिया ज्वालामुखी उद्रेकामुळे झाल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला. पण हा दाव न्यायालयाने खोडून काढला. ज्वालामुखीचं करण देऊ नका, मागील काही दिवसापासून मुंबईच्या एक्यूआय वाढल्याचं आणि मुंबईची दृश्यमानता खालावली असल्याचं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं.मुंबई महापालिका, राज्य सरकारसह महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला भूमिका स्पष्ट करण्याचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने आदेश दिले
मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक घसरला आहे. किनारपट्टी लगतच्या भागातील हवा गुणवत्ता वाईट श्रेणीत गेली आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईतील हवा गुणवत्ता पातळी खालवल्याचे चित्र आहे. याप्रकरणी, सर्व पक्षीय नेत्यांनी आवाज उचलला आहे.
आदित्य ठाकरेंकडून भाजप सरकार फक्त बिल्डर्स आणि कंत्राटदारांना महत्त्व देत असल्याचे म्हणत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नियम शिथील करत बिल्डर्ससाठी जागा खुले करण्याची योजना असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुंबईतील सुरु असलेली बांधकामे जोपर्यंत हवा गुणवत्ता सुधारत नाही तोपर्यंत बंद करावी अशी मागणी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली.
दरम्यान, याप्रकरणी मुंबई महापालिकेकडून पुन्हा एकदा डीपक्लिनिंगचे आयोजन करण्यात येणार असून रस्ते पाण्याने साफ करण्याचे नियोजन करण्यात आले आहेत. मुंबईच्या विविध भागातील हवेचा गुणवता निर्देशांक १६७ पासून २२४ पर्यंत आहे.

