लुधियाना/पंजाबच्या लुधियाना येथून मोठी बातमी समोर येत आहे. लुधियाना येथे पोलीस आणि दहशतावादी यांच्यात चकमक झाली आहे. दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर लाडोवाल टोल प्लाजाजवळ ही चकमकीची घटना घडली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी एक दिवसआधीच अतिरेक्यांना हँड ग्रँनेडसोबत पकडले होते. या अतिरेक्यांची चौकशी केली असता इतर अतिरेक्यांची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांकडून अतिरेक्यांना पकडण्यासाठी आज सापळा रचण्यात आला होता. अतिरेकी संबंधित मार्गाहून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पण अतिरेकी तिथून जात असताना त्यांनी थेट पोलिसांवर गोळीबार सुरु केला. त्यानंतर पोलिसांनी त्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं. या गोळीबारात पोलिसांची गोळी लागल्याने दोन अतिरेकी जखमी झाले आहेत.
या प्रकरणी माहिती देताना लुधियानाचे पोलिस आयुक्त शर्मा यांनी सांगितले की”आम्ही आधी टेटर मॉड्यूलचा भंडाफोड केला आणि तीन आरोपींना पकडलं. त्यानंतर आम्हाला आज बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) संघटनेच्या अतिरेक्यांची माहिती आम्हाला मिळाली होती. हे आरेपी आय एस ए च्या सांगण्यानुसार काम करत होते. आम्ही घेराबंदी केली आणि चकमकीनंतर दोन संशयित आरोपी गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत”,
दरम्यान, चकमक झालेल्या परिसराता आला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे. पोलीस आता सखोल तपास करत आहेत. या प्रकरणात पोलिसांकडून सविस्तर माहिती गोळा केली जात आहे. आरोपींचा मोठा घातपात घडवण्याचा कट होता, अशी चर्चा आहे. या घटनेनंतर आता पोलीस अलर्टवर आहेत. ठिक-ठिकाणी चेकिंग केली जात आहे.
दहशतवाद्यांचे साथीदार हरियाणा आणि अन्य ठिकाणी होते. पोलिसांनी त्यांना सु्द्धा ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. हे दहशतवादी वेगवेगळ्या ठिकाणी ग्रेनेड हल्ले करण्याच्या तयारीत होते. त्यांच्याकडून पिस्तूल, हँड ग्रेनेड पोलिसांनी जप्त केले आहेत. तसेच पोलिसांना दहशतावाद्यांकडे ५० पिस्तूलीच्या गोळ्या मिळाल्या आहेत. त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. आरोपींचे साथीदार इतर राज्यांमधूनदेखील पकडले गेले आहेत. त्यामुळे या दहशतवाद्यांना अडवण्यात पंजाब पोलिसांना मोठं यश आल्याचं मानलं जात आहे.
