नवी दिल्ली/ राजधानी दिल्लीत सोमवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास शक्तीशाली कार बॉम्बस्फोट झाला होता. हा दहशतवादी हल्ला असल्याचं भारत सरकारने म्हटलं आहे. या कार बॉम्ब स्फोटात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या डॉ. उमरचा या कटात सहभाग आहे. या स्फोटात तो स्वत: मारला गेला. डॉ. उमर आणि त्याचे साथीदार बऱ्याच काळापासून या स्फोटाची योजना बनवत होते, तपास यंत्रणांच्या चौकशीत हे समोर आलय. तपास यंत्रणांकडून स्फोटात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांविरोधात वेगवेगळ्या प्रकारची कारवाई सुरु आहे. याच कारवाई अंतर्गत दहशतवादी उमरच घर जमीनदोस्त करण्यात आलं.
लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर तपास यंत्रणांकडून देशभरात छापेमारीची कारवाई सुरु आहे. दहशतवादी उमरने स्फोटाचा कट प्रत्यक्षात आणला. पण त्याचे अन्य साथीदारही आहेत. त्यातल्या काही जणांना अटक झाली आहे. उमरचा ग्रुप मागच्या दोन वर्षांपासून या स्फोटाची योजना बनवत होता. पोलिसांनी उमरचा भाऊ त्याची आई दोघांना ताब्यात घेतलं आहे.उमरच्या आईने पोलीस चौकशीत कबूल केलं की, त्यांना माहित होतं, त्यांचा मुलगा कट्टरपंथी बनलाय. अनेक दिवस त्याच्यासोबत आईच बोलण व्हायचं नाही. स्फोट घडवण्याआधी उमरने कुटुंबियांना कॉल करु नका असं सांगितलं होतं. कुटुंबाने, उमरमध्ये झालेल्या या बदलाविषयी, त्याच्या हालचालींबद्दल पोलिसांना कुठलीही माहिती दिली नव्हती.

