पाटणा/बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. ६ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं आहे. ११ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. निवडणूक प्रचार थंडावलेला असताना अनेकांच्या मनात एक प्रश्न कायम राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांना मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार अनुपस्थित राहायचे. त्यामुळे एनडीएमध्ये सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. नितीश कुमार यांनी याआधी पलटी मारल्यानं निवडणूक निकालानंतर ते वेगळाच गेम करणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यावर भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या रॅलींना, सभांमधील नितीश कुमार यांची अनुपस्थिती रणनीतीचा भाग असल्याचं केंद्रीय मंत्री आणि बिहार विधानसभा निवडणुकीचे भाजपचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. प्रत्येक नेता वैयक्तिक रुपात प्रचार करेल, अशी एनडीएची योजना होती, असं प्रधान म्हणाले. निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि बिहार सरकारच्या निमंत्रणावर ७-८ सरकारी कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता, याकडे प्रधान यांनी लक्ष वेधलं.२४ ऑक्टोबरला जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या समस्तीपूर जिल्ह्यातून निवडणूक प्रचार सुरु झाला. तिथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार, उपेंद्र कुशवाहा आणि चिराग पासवान यांच्यासह एनडीएचे सगळे नेते उपस्थित होते. मोदी आणि नितीश यांच्या स्वतंत्र सभा हा आमच्या रणनीतीचा भाग होता. आम्ही सगळे वैयक्तिक रुपात निवडणूक प्रचार करु, असं ठरलेलं होतं,’ असं प्रधान यांनी सांगितलं. धर्मेंद्र प्रधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे निकटवर्तीय मानले जातात. बिहार निवडणुकीची जबाबदारी भाजपनं मोठ्या विश्वासानं त्यांच्याकडे सोपवली आहे.

