[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

महाविद्यालयातील सद्भावना जत्रेत बुरख्यामुळे मुस्लिम तरुणीना प्रवेश नाकारला


लखनऊ: उत्तर प्रदेशच्या मेरठमधील इस्माईल महाविद्यालय मध्ये दिवाळी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘सद्भावना जत्रे’त बुरखा परिधान केलेल्या महिलांच्या प्रवेशावरुन मोठा गोंधळ झाला. स्टॉल लावण्यासाठी आलेल्या दोन मुस्लिम तरुणींना महाविद्यालय प्रशासनानं बुरखा काढण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. या घटनेवरुन महाविद्यालयाच्या बाहेर मोठा गोंधळ झाला. प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहिलं.
आएशा नावाची तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत सद्भावना जत्रेला आली होती. तिला तिथे आर्टिफिशियल दागिन्यांचा स्टॉल लावायचा होता. दोन्ही तरुणींनी जत्रेतील स्टॉल आधीच बुक केला होता. मात्र तिथे बुरखा परिधान करणाऱ्यांना प्रवेश नसेल, असं महाविद्यालय प्रशासनानं त्यांना प्रवेशावेळी सांगितलं. ‘बुरखा हटवा आणि प्रवेश मिळवा, असं महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला स्पष्ट शब्दांत सांगितलं. चेंजिंग रुममध्ये जाऊन आम्हाला बुरखा काढून साध्या कपड्यांमध्ये येण्यास सांगण्यात आलं. आम्हाला याची कल्पना नव्हती. आम्हाला प्रवेश देण्यात आला नाही. आम्ही मोठ्या आशा, अपेक्षेनं स्टॉल बुक केला होता. पण आमच्या आशेवर पाणी फेरण्यात आलं,’ असं आएशानं माध्यमांना सांगितलं.
महाविद्यालय प्रशासनानं तरुणींना प्रवेश नाकारल्यानं तिथे बराच गोंधळ झाला. बुरखा घालून आल्यास प्रवेश दिला जाणार नाही, ही बाब आपल्याला सांगितलीच नव्हती, असं आएशा आणि तिच्या मैत्रिणीनं महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना अनेकदा सांगितलं. पण त्यांचं काही एक घेण्यात आलं नाही. बुरखा परिधान करुन येणाऱ्यांना प्रवेश नाही, यावर महाविद्यालय ठाम राहिलं
या सगळ्या प्रकाराबद्दल महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना विचारलं असता त्यांनी सुरक्षेचा हवाला देत हात वर केले. त्या तरुणी आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी नव्हत्या. त्यामुळे सुरक्षेचा विचार करुन आम्ही त्यांना बुरख्यात प्रवेश दिला नाही, असं महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं.
दिवाळीच्या निमित्तानं आयोजित जत्रेला ‘सद्भावना’ असं नाव देण्यात आलं होतं. पण त्यात बुरखाधारी महिलांना प्रवेश नाकारण्यात आला. ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा ठरत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी महाविद्यालयानं घेतलेल्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे

error: Content is protected !!